हिंदूंचा उज्ज्वल इतिहास जगाला सांगणे आवश्यक, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन

आपल्या हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाच्या परंपरेत अनेक विविधता निर्माण झाल्या. त्या सगळ्या विविधतांचे एकतेत केलेलं समन्वित, संवादी आणि समरस असं संकलन म्हणजे हिंदू समाज म्हणजेच आजचा भारत देश आहे. हा आपला उज्ज्वल इतिहास जगाला सांगणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.


विशेष प्रतिनिधी

पुणे : आपल्या हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाच्या परंपरेत अनेक विविधता निर्माण झाल्या. त्या सगळ्या विविधतांचं एकतेत केलेलं समन्वित, संवादी आणि समरस असं संकलन म्हणजे हिंदू समाज म्हणजेच आजचा भारत देश आहे. हा हिंदू समाज घडण्याची प्रक्रिया ज्या काळात पूर्णत्वाला गेली हा तो (५ शतक ते १२ वे शतक) काळ आहे. हा आपला उज्ज्वल इतिहास जगाला सांगणे आवश्यक आहे. आपल्या प्रगतीसाठी तो जाणून घेणे देखील तितकाच गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

सुधा रिसबूड लिखित व कॉंटिंनेन्टल प्रकाशित ‘अजेय भारत (५ शतक ते १२ वे शतक- भारतीय इतिहासाचा दैदीप्यमान कालखंड’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. भागवत म्हणाले की, भारत देशात शासननिरपेक्ष स्वतंत्र अशी व्यवस्था आहे ती मोडून काढल्याशिवाय या देशावर राज्य करणे सोपे नाही, ही गोष्ट ज्यावेळी ब्रिटीशांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी आपला गौरवाशाली इतिहास मोडून सांगायला व शिकवायला सुरूवात केली. आपली वैभवशाली परंपरा, वस्तुस्थिती सांगणारे पुरावे दडपले. जे पुरावे उपलब्ध होते त्यांचे विकृत विश्लेषण केले गेले. विदेशींच्या मदतीने काही विद्वानांनी जाणीवपूर्वक बिघडवलेला हा दृष्टीकोन स्वातंत्र्यानंतर ही सुधारण्याची संधी होती मात्र दुर्दैवाने ही सुधारणा होता कामा नये हे नियोजनपूर्वक पाहिले गेले, असेही डॉ. भागवत म्हणाले.

आमच्या इथे इतिहासाची मांडणी करताना निष्कर्ष आधी मांडला जातो त्यानुसार अनुकूल पुरावे, संदर्भ समोर ठेवले जातात. पण जे सत्य आहे, दिसतं आहे अशी कोणतीही गोष्ट मान्य केली गेली नाही. राखीगढीमध्ये हडप्पन संस्कृती संबंधाने झालेले संशोधन त्याचे एक चांगले उदाहरण म्हणून पाहता येईल असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. वसंत शिंदे म्हणाले की, भारतावर अनेक आक्रमण झाली तरीही इथली संस्कृती आजही टिकून आहे. आज आपल्या संस्कृतीत असलेल्या अनेक गोष्टी या हडप्पन संस्कृतीच्या उत्खननाच्या वेळी देखील आढळल्या. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर आपण आर्यांचेच वंशज आहोत हे सर्व पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी लेखिका सुधा रिसबुड यांनी ५ वे शतक ते १२ वे शतक या भारत देशाच्या दैदीप्यमान कालखंडातील इतिहास समोर येणं आवश्यक होते. पण ते मांडण्याचे धाडस कुणी केलं नाही. त्याची गरज लक्षात घेऊन मी हा इतिहास लेखानाचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*