सरकार म्हणून तुम्हाला जमणार नसेल तर…राज ठाकरे यांचा उध्दव ठाकरे यांना इशारा

कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार फायनान्स कंपन्यांना कोणी दिला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. जर सरकार म्हणून तुमच्याकडून हे होणार नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार फायनान्स कंपन्यांना कोणी दिला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. जर सरकार म्हणून तुमच्याकडून हे होणार नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये महिला बचत गटांच्या प्रश्नाला वाचा फोडत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कारभारावर शासनानं नियंत्रण ठेवावं अशी मागणी केली. महिला बचत गटाशी संलग्न असणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्या माता- भगिनींनी कर्जाच्या हप्त्याच्या बाबतीत केव्हाही दिरंगाई केली नाही. पण, चीनी व्हायरसच्या संकटामुळं बचत गटांच्या व्यवसायांवर गदा आली आणि कर्जाचे हप्ते थकले. पण, ग्रामीण महाराष्ट्रात मात्र या कर्ज देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसूलीचा सूर आळवणं सुरूच ठेवलं.

कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, त्याचा चारचौघांच्यात अपमान करणे असले प्रकार सर्रास सुरु असल्याबाबतच्या कैक तक्रारी आपल्यापर्यंत आल्या, असं राज ठाकरे यांनी या पत्रात अधोरेखित करत शासनानं अशा कंपन्यांवर अंकुश ठेवावा अशी मागणी त्यांनी केली.

कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार ह्या कंपन्यांना कोणी दिला, असा सवाल करून ठाकरे म्हणाले, हे सत्र असेच सुरु राहिल्यास याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील. पोलीस प्रशासनाला हाताशी घेत सरकारनं या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवावा. हे जर सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असेही राज यांनी खडसावले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*