वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात देशविघातक शक्ती घुसल्या आहेत. काही परदेशी संघटनांनी आंदोलनाचा देशाच्याविरोधात हत्यार म्हणून वापर करण्यास आता सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी तोडगा काढण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी केले आहे.Foreign Ministry spokesperson Anurag Srivastava appeals to agitating farmers
केंद्र सरकारने कृषी कायदे संसदेत मंजूर करून घेतले आहेत. ते शेती आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. आता त्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. परंतु, त्यावर सोशल मीडियावरची भाष्य आणि प्रतिक्रिया व्यक्त करणारे विशेषतः सेलिब्रेटीची स्टेटमेंट खरी आहेत की नाही, याची शहानिशा करावी, असे श्रीवास्तव म्हणाले.
कृषी कायद्यावरून देशातील काही भागातच असंतोष आहे. आंदोलकांच्या भावनांचा आदर सरकार करत आहे. आंदोलन समाप्त व्हावे, यासाठी शेतकरी संघटनाबरोबर 11 वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या होत्या. अजूनही सरकारने कायदे अंमलात आणलेले नाहीत. अजूनही सरकारने, पंतप्रधान मोदी यांनी तोडग्याची आशा सोडलेली नाही.
परंतु, काही विघातक मंडळी आंदोलनात स्वतःचा अजेंडा राबविण्यासाठी आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. 26 जानेवारीला आंदोलनाला हिंसक वळण लागले, हे त्याचे उदहारण आहे. देशविघातक मंडळी आता परदेशी संघटनांची मदत आंदोलनासाठी घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच संघटनांनी परदेशात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे.
त्याद्वारे देशातील आणि परदेशातील भारतीय नागरिक अस्वस्थ झाले आहेत. दिल्ली हिंसाचारवेळी पोलिसांनी संयम पाळला. त्यात अनेक पोलीस जखमी झाले. आता या सर्व बाबींचा शेतकऱ्यांनी विचार करावा व तोडगा काढण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.