खाद्यान्न उत्पादनात देशात नवा विक्रम होऊ शकतो, रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांचा आशावाद

खाद्यान्न उत्पादनात देशात एक नवा विक्रम होऊ शकतो. मॉन्सून चांगला राहिला असल्याने आणि खरीपाचं पीक चांगलं आल्यानं खाद्यान्न उत्पादनात नवीन विक्रम बनू शकतो, असा आशावाद रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : खाद्यान्न उत्पादनात देशात एक नवा विक्रम घडू शकतो. मॉन्सून चांगला राहिला असल्याने आणि खरीपाचं पीक चांगलं आल्यानं खाद्यान्न उत्पादनात नवीन विक्रम बनू शकतो, असा आशावाद रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मौद्रिक धोरण समिती (एमपीसी) च्या बैठकीत घोषणा करत म्हटलं की, एमपीसीने रेपो रेट चार टक्क्यांवरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयकडून आर्थिक वृद्धीसाठी उदार धोरण अवलंबलं आहे.

कोरोना व्हायरस विरोधातील लढाईमध्ये भारतीय अर्थव्यवस्था निर्णायक टप्प्यात आहे. अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या तिमाहीत आलेली घट मागे पडली आहे. या स्थितीमध्ये सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. अंकुश लावण्यापेक्षा आता अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चालू वित्तिय वर्षात चौथ्या तिमाहीपर्यंत महागाई देखील आटोक्यात येण्याची चिन्हं आहेत, असं देखील दास यांनी म्हटलं आहे.

चीनी व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असल्याची माहिती दास यांनी दिली. ते म्हणाले की, आरबीआयच्या पतधोरणानंतर शेअर बाजार वधारला आहे. आजपासून आरटीजीएस 24 तास सुरु राहणार आहे. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. मॉनेटरी पॉलिसी कमिटीने रेपो रेट 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवरच ठेवला आहे.

रेपो रेटमध्ये कुठलाही बदल न केल्यानं हे स्पष्ट झालं आहे की, इएमआय आणि लोनवरील व्याजांवर कुठलाही दिलासा मिळणार नाही. रेपो रेटमध्ये काही बदल होईल याबाबत पहिल्यापासून कमी आशा होती. ऑगस्ट महिन्यात देखील पॉलिसी रेट मध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र त्याआधी फेब्रुवारीमध्ये रेपो रेटमध्ये 2.50 टक्के कपात करण्यात आली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*