फडणवीस गिरीश महाजनांना म्हणाले, “मला कोरोना झाला तर, सरकारी रूग्णालयातच दाखल कर”


सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा सरकारी रूग्णालयांवर विश्वास नाही का?


विशेष प्रतिनिधी

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीतही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील निरनिराळ्या भागांचे दौरे करत आहेत. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्राला म्हणजेच माजी मंत्री गिरीश महाजन यांना एक सूचना करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. “मला करोनाची लागण झालीच तर मला सरकारी रुग्णालयातच दाखल कर,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले.

देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह गिरीश महाजन यांनी देखील राज्यातील अनेक भागांचा दौरा केला. यादरम्यान, त्यांच्यात झालेल्या संभाषणाबद्दल गिरीश महाजन यांनी उलगडा केला. सरकारनामाने याची बातमी दिली आहे.

“राज्यातील सर्वसामान्य जनतेला उपचार मिळत नाही. परंतु नेतेमंडळी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. ही परिस्थितीत पाहिल्यानंतर आम्ही राज्यातील अनेक ठिकाणच्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी अनेकांनी कोविड रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या,” असे महाजन यांनी सांगितले.

“करोनाची लक्षणे नसतानाही काही नेते मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. हे चित्र वाईट आहे. यासंदर्भात आमची चर्चा सुरू असतानाच फडणवीस म्हणाले, “गिरीश मला कोविडची लागण झाली तर मला खासगी रुग्णालयात दाखल करू नको. मला सरकारी रुग्णालयात दाखल कर. याचे मला वचन दे,” असे फडणवीस म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.

“राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असतानाही कोणताही मंत्री फिरत नाही. तर मुख्यमंत्रीही घरातच बसले आहेत. फडणवीस, दरेकर आणि मी राज्यभर फिरत आहोत. राज्यात परिस्थिती बिकट असून रुग्णांची दखलही घेण्यास कोणी तयार होत नाही. नेत्यांना करोना झाला तर ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत. त्यांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो,” असेही महाजन म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था