इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा, पण महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे काय, केशव उपाध्ये यांचा सवाल

उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्याचा अधिकार जरूर आहे. परंतु, महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं काय? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पहाणार? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्याचा अधिकार जरू आहे. परंतु, महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं काय? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पहाणार? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

उपाध्ये म्हणाले, हाथरस प्रकरण दुर्दैवीच आहे आणि त्याची दखल घेत तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई केली. प्रकरण सीबीआयकडे दिले. पण इथे गेल्या सहा महिन्यांत ज्या घटना घडल्या त्यांवर किती कारवाई झाली? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पहाणार? महाराष्ट्रातील लेकीसुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्याच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार ? गेल्या सहा महिन्यांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय ?

उपाध्ये म्हणाले, हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाला अधिकार आहे. मात्र त्याच बरोबर हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी आहेत, त्या सरकारने गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे.

महाराष्ट्रात कोरोनावर उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णांवर बलात्कार, विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत. पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे शासकीय लॅबमधील टेक्निशियनने कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याची घटना घडली आहे.

फेब्रुवारीमध्ये मध्ये 7 वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांना जिवंत जाळले गेले. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरा रोड, लातूर, नागपूर, लासलगाव या ठिकाणी या घटना घडल्या. यातील चौघींना जीवाला मुकावे लागले. या घटनांचे गांभीर्य बाळासाहेब थोरात किंवा त्यांच्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादी व शिवसेनाला समजलेले नाही, असे म्हणायचे का, असा सवाल उपाध्ये यांनी केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*