विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तेचा फासा आम्ही पलटवू तेव्हा कोणाची शिडी घेणार नाही, असे सूचक राजकीय वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा – भाइंदरमध्ये केले आहे. महापालिकेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.devendra fadanvis suggests politcal wind change in maharashtra
महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रीपदावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत. नाना पटोलेंना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपद देऊन महाविकास आघाडीत स्वतःचे स्थान मजबूत करण्याचा फासा आजच टाकला आहे. या पार्श्वभूमीवर देखील फडणवीस यांच्या वक्तव्याला राजकीय महत्त्व आहे.
भाजप सगळ्यात मोठा पक्ष असताना १९९० च्या दशकात कम्युनिस्ट आणि काँग्रेसने एकत्र येऊन लोकशाहीत जनतेने दिलेल्या कौलाची थट्टा केली होती. त्यावेळी प्रमोद महाजनांनी लोकशाहीची वेगळी व्याख्या केली होती. तशीच परिस्थिती आज आहे.
महाराष्ट्रात जनतेने कौल महायुतीला दिला होता. पण शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी जनतेच्या कौलाच्या विरोधात एकत्र येऊन लोकशाहीची थट्टाच केली, अशी टीका फडणवीसांनी केली.
पण लवकरच राज्यातल्या सत्तेचा फासा भाजप पलटवेल, असे सूचक वक्तव्य करून त्यांनी महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद यांच्यावरून राजकीय वादळाची सुरूवात झाल्याचे सूचित केले.
अमित शहांच्या दौऱ्याची पार्श्वभूमी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्गात येणार आहेत. कोकणाचा अमित शहांचा दौरा राजकीय अर्थाने देखील महत्त्वाचा मानला जातो आहे. या पार्श्वभूमीवर देखील फडणवीसांच्या आम्ही फासा पलटवू, या राजकीय विधानाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पाहिले जात आहे.