वृत्तसंस्था
बर्लिन : जगात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या चोवीस तासात सुमारे चार लाखाहून अधिक लोकांना बाधा झाली असून ७ हजारापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जगात आतापर्यंत १२.३८ कोटीहून अधिक लोकांना बाधा झाली आहे. त्यापैकी दहा कोटीहून अधिक नागरिक बरे झाले आहेत तर २७.३५ लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या दोन कोटीहून अधिक नागरिक रुग्णालयात आहेत. Corona ceases increased in whole world
जर्मनीत कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहता लॉकडाउनचा कालावधी १८ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांनी कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी कडक निर्बंध आणण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, ब्रिटनमध्ये अनावश्यलक परदेश प्रवासावर बंदी घालण्याची तयारी केली जात आहे. हा नियम येत्या सोमवारपासून लागू होण्याची शक्यता आहे. हा नियम जूनपर्यंत राहू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे.
जर्मनीतील सर्व १६ राज्यातील नेत्यांना कोरोनाविरोधात मोहीम राबवताना कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पुन्हा अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृतांची संख्या वाढल्याबद्धल चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वॅन करखोवे यांनी म्हटले की, गेल्या सहा आठवड्यापासून मृतांचा आकडा कमी राहत होता, मात्र गेल्या आठवड्यात त्यात वाढ दिसून आली. नवीन रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या देखील वाढत चालली असून ही बाब चिंताजनक आहे.