प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना समजेना प्रभारी पाटलांचे इंग्रजी, डावलले जात असल्याचे म्हणत राजीनाम्याची तयारी

महाराष्ट्रातील गलितगात्र झालेल्या कॉंग्रेसला कॉंग्रेस नेतृत्वाने नवा प्रभारी दिला खरा, पण त्यांचे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पटेनासे झाले आहे. पाटलांचे इंग्रजी बाळासाहेबांना समजेना आणि बाळासाहेबांचे हिंदी पाटील यांना कळेना. त्यातच पाटील हे परस्पर बैठका आणि निर्णय घेत असल्याने बाळासाहेब थोरात यांनी राजीनाम्याची तयारी केली आहे. Congress State President Balasaheb Thorat news


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील गलितगात्र झालेल्या कॉंग्रेसला कॉंग्रेस नेतृत्वाने नवा प्रभारी दिला खरा, पण त्यांचे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पटेनासे झाले आहे. पाटलांचे इंग्रजी बाळासाहेबांना समजेना आणि बाळासाहेबांचे हिंदी पाटील यांना कळेना. त्यातच पाटील हे परस्पर बैठका आणि निर्णय घेत असल्याने बाळासाहेब थोरात यांनी राजीनाम्याची तयारी केली आहे.

पाटील मराठीत फारसे बोलत नाहीत. त्यांचे इंग्रजीत बोलणे अनेक आमदारांना समजत नाही. पक्षाचे चिटणीस बी.एम. संदीप हेदेखील कर्नाटकचे आहेत. तर वामशी रेड्डी आणि संपत कुमार हे तेलंगणाचे आहेत. हे चौघेही हिंदी न बोलणारे असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचणी येत असल्याचे बाळासाहेब थोरात यांच्या गटातील आमदारांचे म्हणणे आहे.प्रदेशाध्यक्षांना न कळवता परस्पर बैठका आणि निर्णय होतात. त्यानंतर त्याची माहिती प्रदेशाध्यक्षांना मिळते, असेही बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्षांना डावलून प्रभारींकडून आमदारांना बोलावले जाते, बैठका घेतल्या जातात. सीमाप्रश्नी कर्नाटकच्या बाजूने भांडणारे नेते अशी पाटील यांची ओळख आहे. महाराष्ट्रात ही गोष्ट काँग्रेसला अडचणीची ठरू शकते. त्यामुळे प्रभारीच बदलण्याची गरज असल्याची चर्चा दिल्लीच्या कानावर घालण्यासाठी थोरात गेल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

प्रदेशाध्यक्ष असूनही मुंबई कॉंग्रेसमध्ये बदल करताना थोरात यांना विचारले नाही. यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण गटाची सरशी झाली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मराठा समाजाकडे गेले. या निर्णयामुळे राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अन्य कोणाकडे तरी द्यावे, अशी चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. पण नव्या बदलांमुळे ते पद चव्हाण यांना मिळेल का याविषयी शंका आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे नेतेपद आणि महसूल मंत्री अशी तीन पदे आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे देण्याची मागणी होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या पदासाठी उत्सुक नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद द्यावे, असा आग्रह सुरुवातीला धरला होता.

Congress State President Balasaheb Thorat news

प्रदेशाध्यक्ष पदावरून सतत होणाऱ्या चर्चांना विराम देण्यासाठी, नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची विनंती करण्यासाठी दिल्लीत आल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थोरात यांच्यावर विशेष मर्जी असली, तरीही विधान परिषदेच्या नावांसाठी त्यांचे फारसे ऐकले गेले नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*