विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी दोन दिवस प्रचारासाठी आसाममध्ये दाखल झाले. त्यांनी जोरहाटमध्ये मोर्चाला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. भाषणादरम्यान राहुल गांधींनी आसामी जनतेवर आश्वासनांची लयलूटही केली. राहुल म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास राज्यात महिलांना महिन्याला दोन हजार रुपये आणि राज्यातील पाच लाख तरुणांना रोजगार देण्यात येईल. Congress manifesto for Assam, free electricity, 5 lakh jobs, Rs 2,000 per month for women
विशेष प्रतिनिधी
जोरहाट : विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी दोन दिवस प्रचारासाठी आसाममध्ये दाखल झाले. त्यांनी जोरहाटमध्ये मोर्चाला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. भाषणादरम्यान राहुल गांधींनी आसामी जनतेवर आश्वासनांची लयलूटही केली. राहुल म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास राज्यात महिलांना महिन्याला दोन हजार रुपये आणि राज्यातील पाच लाख तरुणांना रोजगार देण्यात येईल.
जोरहाटमधील मोर्चाच्या वेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, हे सरकार केवळ हम दो और हमारे दोसाठी काम करतंय. गरीब, शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांचा विचार केला जात नाही. वाढत्या महागाईबद्दल बोलताना राहुल म्हणाले की, तुमच्या खिशातील पैसे भांडवलदारांच्या खिशात टाकले जात आहेत. मोदी सरकार हेच करत आहे.
राहुल गांधी यांच्या पाच मोठ्या घोषणा
राहुल गांधी म्हणाले की, सीएए आसाममध्ये येणार नाही. आम्ही याची अंमलबजावणी आसाममध्ये किंवा देशात होऊ देणार नाही. ते म्हणाले की, आम्ही चहा कामगारांना 365 रुपये देऊ. सध्या याचे 165 रुपये मिळतात. तिसरी हमी, प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत मिळेल. चौथी हमी, महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्यात येतील. याशिवाय आसाममध्ये पाच लाख तरुणांना रोजगार देण्यात येईल. सर्व रिक्त जागा भरल्या जातील.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, कॉंग्रेस सरकार आसाममध्ये परत येईल आणि राज्यात शांतता नांदून आसाम विकासाच्या मार्गावर जाईल. याआधी शुक्रवारी राहुल गांधींनी दिब्रूगड येथे जाहीर सभा घेतली. तेथे त्यांच्या गळ्यात ‘नो सीएए’ असे लिहिलेला गमछा होता. येथेही राहुल गांधींनी आक्रमकपणे मोदी सरकारविरुद्ध वक्तव्ये केली. त्यांनी आसाममधील विद्यार्थ्यांशीही संवादही साधला.
पंतप्रधान मोदीही आज आसाममध्ये
दरम्यान, आज आसाममध्ये निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे राहुल गांधी दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदीही आज आसाम दौर्यावर येणार आहेत. येथे आल्यावर ते दिब्रुगड येथे निवडणूक सभा घेतील. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आसामच्या करीमगंज येथे पहिली सभा घेतली होती.