विशेष प्रतिनिधी
मुंबई : “सगळा हिंदू समाज सडलायं, तो मॉब लिंचिंग करतो,” या शरजील उस्मानीच्या घृणास्पद आणि भडकाऊ वक्तव्यावरून महाराष्ट्रातले वातावरण तापले असताना ठाकरे – पवार सरकारमधले राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांची शरजीलच्या विधानाचे एकाच वेळी समर्थन आणि विरोध करताना तारांबळ उडाली आहे.chhagan bhujbal confused over sharjeel usmanis statement against hindu society
एल्गार परिषदेत शरजीलने सगळा हिंदू समाज सडलाय, असे भडकाऊ विधान करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे भुजबळांना धड समर्थन करता येईना आणि एल्गार परिषदेशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जवळीक पाहता विरोधही करता येईना. त्यामुळे त्यांनी गुळमुळीत भूमिका घेऊन पोलिस त्या वक्तव्याची चौकशी करतील, असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी आपले वक्तव्य हिंदू समाजाविरोधात तर जाणार नाही ना, याची काळजी घेण्याच्या प्रयत्नात भुजबळ दिसले. एखाद्याने संपूर्ण समाजाला असा दोष देणे बरोबर नाही. काही दोष असू शकतात. पण त्याविषयी आपण ज्या भाषेचा आणि शब्दांचा वापर करतो, त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. मतस्वातंत्र्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असला तरी त्याचा वापर करताना भान बाळगले पाहिजे.
ज्या हिंदू समाजाबद्दल शरजीलने ते वक्तव्य केले, त्याच समाजातून महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांनी समाजातूनच पुढे येऊन सुधारणा केल्या, असे विधान भुजबळांनी करून आपली बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला.
पण शरजीलचे मूळ विधानच एवढे भडकाऊ आणि हिंदू समाजाचा अपमान करणारे आहे, की त्याचे थेट समर्थन करणे भुजबळांसारख्या नेत्यालाही बरेच जड गेले आणि त्यातून त्यांची राजकीय तारांबळ उडाली.