विनायक ढेरे
नाशिक : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचा अध्याय ठरलेल्या चौरी चौरा आंदोलनाच्या शताब्दीची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनाने शानदार झाली. त्यांनी चौरी चौरा आंदोलनातील शहीदांना श्रद्धांजली वाहून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या शहीदांना योग्य स्थान मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली… ती पूर्णपणे खरी आहे. पण चौरी चौराचे आंदोलन मूळात गाजले होते, ते महात्मा गांधी यांनी आंदोलनातील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून ते मागे घेतल्यामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या अहिंसक आंदोलनाच्या चेतनेमुळे.chauri chura agitation centenary, gandhji resopsible agitation
आज नेमकी हीच “जबाबदारीची” भावना विसरली गेली आहे. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाची हाक दिली. कायदेभंग करा पण अहिंसक मार्गाने… अहिंसेच्या तत्त्वामध्ये कोणतीही तडजोड करू नका, ही गांधीजींची तात्त्विक भूमिका होती. चौरी चौरात नेमके उलटे घडले. आंदोलनाच्या जोशात गांधीजींचे अनुयायी त्यांचा मूळचा अहिंसा आंदोलनाचा मंत्र विसरले.
आणि पोलिस स्टेशन जाळून बसले. पोलिस गेले. आंदोलकांनाही त्याची झळ बसली… पण या हिंसाचाराचे गांधीजींना दुःख झाले. त्यातून आणखी काही ठिकाणी आंदोलनातून हिंसा पेटू नये म्हणून त्यांनी त्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून देशव्यापी आंदोलन मागे घेण्याची हिंमत दाखविली. त्यावेळी त्यांच्यावर अनेक पुढाऱ्यांनी अवसानघातकीपणाची टीकाही केली. ती गांधीजींनी सहन केली. पण जबाबदारी झटकली नाही की आपले अहिंसा तत्त्व त्यांनी सोडले नाही. चौरी चौरातील हिंसाचाराची जबाबदारी म्हणून गांधीजींनी २१ दिवसांचे उपोषणही केले.
गांधींजींनी आंदोलन मागे घेतले पण त्यातली धग कमी होऊ दिली नाही. आंदोलन सुरू कधी करायचे, मागे कधी घ्यायचे, तत्त्वासाठी कसे ठाम राहायचे याची शिकवण गांधींजींनी चौरी चौराच्या निमित्ताने आपल्या अनुयायांना दिली. पण त्याच बरोबर आंदोलनाच्या ओघात वाहून जाऊन आपल्या नावावर काहीही केले तरी चालेल अशा उत्साही वीरांना आपल्या नेतृत्वाला गृहीत धरता येणार नाही, असा “राजकीय संदेश”ही दिला होता. हे या निमित्ताने विसरून चालणार नाही.
आतापर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये चौरी चौराच्या आंदोलनाला गांधीवादी अहिंसेच्या चष्म्यातून पाहिले गेले. हे खरेच आहे. त्यातील महामना पंडित मदनमोहन मालवीय आणि बाबा राघवदास यांची अतुलनीय कामगिरी विसरली गेली हेही खरेच आहे. पंतप्रधानांनी आज त्याची आठवण करवून दिली…पण त्याच बरोबर हेही खरे आहे की गांधीजींनी आंदोलनाची जबाबदारी स्वीकारल्याचा महत्त्वाचा गाभा गांधीवादी इतिहासकारांकडूनही विसरला गेला.
आज गांधीजींचा फोटो लावून वेगवेगळी आंदोलने करणाऱ्या आणि “तुमचे सावरकर तर आमचे गांधी”, असे म्हणत शेतकरी आंदोलनात शिरकाव करणाऱ्या “नकली” गांधींना आंदोलनाची जबाबदारी नावाच्या शब्दांची पुसटशी जाणीवही नाही. चौरी चौराच्या शताब्दीच्या निमित्ताने गांधीजींच्या आंदोलनाच्या बरोबरीने जबाबदारीही या तत्त्वाच्या शताब्दीचेही स्मरण…!!