भालकेंच्या घरातच उमेदवारी की नव्या चेहऱ्याला संधी? पंढरपुरची निवडणूक रंगतदार होणार


विशेष प्रतिनिधी

सोलापूर – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता कमालीचा वेग आला असून कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण आमदार होणार याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. Candidate in Bhalkes house or opportunity for a new face?

या पोटनिवडणुकीत आता राष्ट्रवादीकडून कुणाला तिकीट दिलं जाणार आणि भाजपकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकींनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्ण बदलली आहे. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्व आहे.

भालके कुटुंबाला डावलणे कठीण

आमदार भारत भालके यांचं गेल्या २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले. भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ मध्ये ते राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांनी या कारखान्यावर कायम वर्चस्व ठेवले. पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात सलग तीन वेळा (कै) भारत भालके यांनी बाजी मारुन हॅट्रीक केली होती. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाली होती. विशेष म्हणजे तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले.२००९ मध्ये त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला. त्यावेळी भालके हे जायंट किलर म्हणून राज्याला परिचीत झाले. २०१४ मध्ये त्यांनी प्रशांत परिचारक यांचा तर गेल्या वेळी म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी ज्येष्ठ नेते व माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा पराभव केला होता. त्यामुळे भालके यांनी गेल्या दहा वर्षांत मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजविले होते.

त्यामुळे आता उमेदवारी देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना भालके यांच्या प्रतिमेचा विचार करावाच लागणार आहे. भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे.

भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली. पक्ष निरीक्षकांनी घेतलेल्या बैठकीत देखील भगिरथ यांचेच एकमेव नाव पुढे आले. तथापी निवडणूकीसाठी इच्छुक असलेले डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन श्री. पवार यांची भेट घेतली होती. दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी देण्याविषयी विचारणा होत असल्याचे जाहीरपणे केले आहे. परंतु कोणत्याही पक्षाने अजून उमेदवारीची घोषणा केलेली नाही. शिवसेनेच्या शैला गोडसे हे देखील निवडणूकीसाठी इच्छुक आहेत.

परिचारक गटाची भूमिका निर्णायक

राजकीय हालचालींना वेग आलेला असताना परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेची मूदत आणखी साधारण एक वर्ष आहे. त्यामुळे युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक अथवा युवा नेते प्रणव परिचारक यांना रिंगणात उतरवावे, असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. परंतु आमदार प्रशांत परिचारक यांनी अजून नेमकी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे यावेळी परिचारक कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार का भाजप जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पण परिचारक गट सध्या पोटनिवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं बोललं जात आहे.

भाजपाकडून औताडे यांचे नाव आघाडीवर

भाजपाकडून कोणाला उमेदवारी द्यायची, या विषयी चाचपणी सुरु आहे. मात्र भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान औताडे यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे. बांधकाम ठेकेदार म्हणून समाधान आवताडे हे देखील भाजपा नेत्यांच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या किंवा औताडे यांना भाजपकडून उमेदवारी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह दिला जाऊ शकतो.

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थीतीमुळे या पोटनिवडणुकीला खास महत्व आहे. शिवाय या मतदारसंघात आता महाआघाडीमुळे शिवसेनेच्या अस्तिताचे काय होणार हाही प्रश्न आहे. तसेच विविध पक्षांतून अनेक मातब्बर इच्छुक असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की.

Candidate in Bhalkes house or opportunity for a new face?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती