जळगावातला भगवा बदल… शिवसेनेचे यश… की अपुरे होमवर्क करणाऱ्या गिरीश महाजनांसकट भाजपच्या नेतृत्वाचे अपयश…??

विशेष प्रतिनिधी

जळगाव – तब्बल २७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसल्यानंतर भाजपाने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केले असल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव केला. BJP lost power in jalgaon within two and half years, responsibility goes to central leadership also

पण जळगावातला हा भगवा बदल म्हणजे… भाजपचा भगवा जाऊन शिवसेनेचा भगवा फडकणे हे शिवसेनेचे यश आहे… की भाजप नेत्यांचे अपयश…?? अपुरा होमवर्क करून एक विषय पूर्णपणे वगळून परीक्षेला बसले की परीक्षार्थीला अपयश येते असे काहीसे गिरीश महाजनांचे आणि महाराष्ट्रातल्या टीम भाजपचे झाले आहे. एकनाथ खडसेंना दुखावून बाहेर काढल्यानंतर जळगावात गिरीश महाजनांनी जी बांधबंदिस्ती टिकवायला हवी होती… ती टिकविली नाही. सत्तेवर असताना त्यांनी फोडाफोडी करून भाजप बळकट करून दाखविला पण पुरेशा मुत्सद्देगिरीअभावामुळे राज्यातली देखील सत्ता गमावल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती आधी सांगलीत आणि आता जळगावात झाली आहे.केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर भाजपचे नेतृत्व कितीही मजबूत असले, तरी महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व स्थानिक पातळीवरील राजकारण हातळण्यात कितीतरी पातळ्यांवर कमी पडते, हे आधी सांगलीच्या निवडणूकीने दाखवून दिले. त्यातून देखील धडा घेऊन राजकीय बांधबंदिस्ती केली नाही त्याचा परिणाम जळगावने दाखवून दिला.

-भाजपच्या केंद्रीय नेत्यांची मनमानी

भाजपने एकनाथ खडसेंसारखा नेता दुखवून ठेवायला हरकत नाही… पण पर्यायी नेतृत्व नको का तेवढेच किंबहुना अधिक मजबूतीने उभे करायला… ते कोण करणार…?? पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आपल्याला हवे तसे निर्णय घेऊन मोकळे होणार आणि खाली त्याचे परिणाम राज्य आणि स्थानिक नेतृत्वाला भोगायला लागणार… ही भाजपची कार्यशैली जळगावात भोवली आहे. तिथे भाजपने या कार्यशैलीमुळे सत्ता गमावली आहे.

-महाजनांचा १५ मतांनी विजय

जयश्री महाजन यांनी प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला. जयश्री महाजन यांना ४५ मते मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३० मते मिळाली. भाजपाचे 27 नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.

महापालिका निवडणुकीत गिरीश महाजनांनी फोडाफोडीच्या राजकारणातून आपला खुंटा मजबूत केला होता. तोच कित्ता आता शिवसेनेने गिरवला. गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला. घरच्या धावपट्टीवर त्यांना चितपट करण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला होता. भाजपच्या फुटीर नगरसेवकांसह गुलाबराव पाटील ठाण्यातील हॉटेलमध्ये थांबले होते.

महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक फुटल्याने गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली. ते आपले सदस्य टिकवून धरू शकले नाहीत. एकूण ७५ सदस्य असणाऱ्या महापालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे संख्याबळ होते. पण जवळपास निम्मे नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाल्याने भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण लागले आहे.

BJP lost power in jalgaon within two and half years, responsibility goes to central leadership also

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*