मुंबईत कमावले, ते जळगावात गमावले!!


विनायक ढेरे

मुंबई – मनसुख हिरेन – सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला “वरून” चेपण्यात भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी जे कमावले ते जळगावात घालवले. देवेंद्र फडणवीसांनी १० दिवस विधिमंडळ गाजवून सोडले. अकेला देवेंद्र क्या करेगा, असे म्हणणाऱ्यांचे पुढे आलेले दात त्यांनी घशात घातले हे खरे… BJP lost power in jalgaon lack of political wisdom lead to defeat

…पण नुसते हाताला लागलेले प्रभावी मुद्दे, प्रभावी मांडणी, सभागृहातली भाषणे म्हणजे राजकारण नव्हे, तर त्याही पलिकडे जाऊन करावी लागणारी राजकीय बांधबंदिस्ती, आपली ताकद टिकवून ठेवण्याची क्षमता, त्यासाठी दाखवावी लागणारी मुत्सद्देगिरी म्हणजे राजकारण हे भाजप नेत्यांना एव्हाना समजायला हवे आणि ते केंद्रीय पातळीपासून राज्याच्या पातळीपर्यंतच्या नेत्यांना जळगावमधील पराभवाने तरी समजायला हवे.… नाही तर आपणच बाहेर घालविलेल्या नेत्यांना राजकीय वाकुल्या दाखवायची संधी मिळते, हे एकनाथ खडसेंच्या विधानांवरून भाजपच्या नेत्यांनी समजून घ्यायला हरकत नाही. एकनाथ खडसेंनी सांगून टाकले, की गेल्या १० दिवसांत सगळे ठरले. मी उद्धव ठाकरेंना विनंती केली की तुम्ही लक्ष घाला. मी शिवसेनेचा महापौर करायला मदत करतो. गिरीश महाजनांवर नाराज असलेले २२ नगरसेवक आधीच संपर्कात होते त्यात आणखी जोडले… वगैरे बरीच पाठ खडसेंनी थोपटून घेतली. त्यांनी पाठ थोपटून घेतली हे खरे… पण भाजपच्या नेत्यांनी आपल्या कृत्यांनी आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या अभावी ती थोपटू दिली ही देखील राजकीय वस्तुस्थिती आहे. ती कशी नाकारून चालेल…??

समोरच्या नेत्याला निष्प्रभ करण्यासाठी त्याचा पराभव करावा लागतो. नुसता पक्षातून काढून चालत नाही. त्याला तोडीस तोड किंबहुना त्याच्या पेक्षा जास्त ताकद निर्माण करावी लागते… हे भाजपच्या केंद्रीय पातळीपासून ते राज्याच्या पातळीवरील नेत्यांना समजत नाही का… समजत नसेल… त्यांची “राजकीय बुध्दिमत्ता” त्यांची त्यांनाच लखलाभ…!!

देवेंद्र फडणवीस, आशिश शेलार ही मंडळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मागे हात धुवून लागली होती… ते शेलारही फक्त उध्दव ठाकरे – आदित्य ठाकरेंच्या मागे हात धुवून लागतात… पण पवारांच्या कच्छपी लागतात… हे सगळ्या मुंबईने पाहिले आहे. पण त्यातून भाजपची सर्वंकष सत्ता स्थापन होणार आहे काय…?? एकट्या उध्दव ठाकरेंना चीतपट करून महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळणार आहे का…?? पवारांनी एकदा फसवून देखील त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहात राहतात… याला भाजपच्या नेत्यांची मुत्सद्देगिरी म्हणायची काय…?? हात धुवून मागे लागणे आणि कच्छपी लागणे या दोन म्हणींमधला फरक भाजपच्या नेत्यांना समजतो तरी का…?? समजत असेल तर मग ते तसे का वागतात…??

इकडे सचिन वाझे प्रकरण विधिमंडळात जोरात असताना त्याचवेळी जळगावात राजकीय हालचाली सुरू होत्या हे खडसेंनीच आपल्या तोंडून सांगितले आहे… मग गिरीश महाजन तेव्हा काय करीत होते… विधानसभेत फडणवीसांच्या मागच्या बाकावर बसून नुसते हातवारे करून बोलत होते की… अधून – मधून नुसते वेलमध्ये येत होते… त्यांना जळगावात काय चाललेय याची कल्पना नव्हती…??

आपणच अडीच वर्षांपूर्वी मेहतन करून राजकीय फोडाफोडी करून ५७ नगरसेवक निवडून आणले, ते टिकवून धरण्याची वेळ प्रसंगी साम दाम दंड भेद नीती वापरून खेचून धरण्याची जबाबदारी गिरीश महाजनांची नव्हती…?? मग काय करीत होते ते…?? आता नुसती सगळे मुसळ केरात गेल्यावर कोर्टात जाण्याची आदळआपट करून काय होणार आहे??

त्यासाठी खरा दमखम दाखविला पाहिजे… एकाच वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीला खरोखरी लोळवून त्यांना आस्मान दाखविण्याचा… भाजपचे सर्व पातळ्यांवरचे नेते तो दाखवतील…?? की पुन्हा गुरू आणि गुरूदक्षिणा त्या दमखम दाखविण्याच्या आड येईल…??

BJP lost power in jalgaon lack of political wisdom lead to defeat

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था