भाजपाच्या दुर्गापूजेसाठी मुस्लिम कारागिरांकडून मंडपाची उभारणी, नरेंद्र मोदी होणार दुर्गापूजेत सहभागी

दुर्गा पूजेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील शंभराहून अधिक मंडपांशी संपर्क साधून दुर्गा पूजा उत्सवात सहभागी होणार आहेत. यासाठी पश्चिम बंगालमधील मुस्लिम कारागीर मंडप तयार करत आहेत.


वृत्तसंस्था

कोलकाता : दुर्गा पूजेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील शंभराहून अधिक मंडपांशी संपर्क साधून दुर्गा पूजा उत्सवात सहभागी होणार आहेत. यासाठी पश्चिम बंगालमधील मुस्लिम कारागिर मंडप तयार करत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यावेळी दुर्गा पूजेत सहभागी होऊन नागरिकांशी संपर्क साधणार असल्याने हा कार्यक्रम महत्वाचा मानला जातोय. भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. पण पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचे मंडप भाजप कुशल मुस्लिम कारागिरांकडून बांधून घेते. भाजपचा त्यांच्या सर्जनशीलतेवर मोठा विश्वास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २२ तारखेला सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत पूर्व विभागीय सांस्कृतिक केंद्रात खास बांधलेल्या पूजा मंडपाचे उद्घाटन करतील. संपूर्ण कार्यक्रम दिल्लीहून व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात येईल. पण बंगालला दिला जाणारा संदेश हा खराखुरा असेल. हा भव्य मंडप एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत बांधून पूर्ण होत आहे.

यामागे ३० कुशल कारागिरांचे परिश्रम आहेत. ३० पैकी २० कारागिर हे मुस्लिम आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक कालावधीपासून आम्ही दुर्गा पूजेसाठी मंडप बांधत आलोय. पण यावेळी पंतप्रधानांसाठी मंडप बांधणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं ४२ वर्षीय अशरफ गाझी यांनी सांगितलं.

आम्ही मंडप बांधण्याचेच काम करत असतो. यावेळी हे काम आम्हाला कमी वेळेत पूर्ण करायचे होते. म्हणून आम्ही मंडप उभारण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहोत. यामुळे तो चांगला बांधला जाऊ शकेल. धर्म आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. आम्ही मंडप बांधतो. मग ईद मिलाद असो की पूजा आम्ही हे सर्व काम करतो. यात काही फरक नाही, असं उत्तर २४ परगणा येथील रहिवासी गाझी म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*