बिहारमधील प्रादेशिक पक्षांच्या टकरीत मतांच्या टक्केवारीत भाजपाची मुसंडी

  • टक्केवारीत डबल डिजिट गाठणारा भाजप ठरला एकमेव राष्ट्रीय पक्ष
  • काँग्रेस बसपा राष्ट्रवादी खिजगणतीतही नाहीत

वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे संयुक्त जनता दल आणि लालू प्रसाद यांचे राष्ट्रीय जनता दल या प्रादेशिक पक्षांच्या टकरीत राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून भाजपने मतदानाच्या टक्केवारीत मोठी मुसंडी मारली आहे.

बिहारची निवडणूक जदयू आणि राजद या दोन प्रादेशिक पक्षांभोवतीच गेली वीस वर्षे फिरत आहे. हे दोन्ही प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांना आपल्या आघाडीत सामील करून घेत आहेत. यातून प्रादेशिक पक्षांची मतांची टक्केवारी कायम राहून काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपने मतांची टक्केवारी सतत वाढवत नेणे हे पक्षाचे संघटनात्मक यश मानण्यात येते आहे.

राष्ट्रीय पक्षांची बिहारमधील मतांची टक्केवारी गेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये वाढलेली दिसत आहे. निवडणूक डेटा विश्लेषणानुसार, भाजपाने यात मोठी बाजी मारली असून टक्क्यांचे डबल डिजीट गाठणारा तो बिहारमधील एकमेव राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. नोव्हेंबर २००० मध्ये झारखंड बिहारपासून वेगळे झाल्यानंतर राज्यात एकूण चार विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.

बिहार निवडणुकीत सहा राष्ट्रीय पक्षांची एकूण मतांची टक्केवारी पाहिली तर २००५ मधील २३.५७ % पासून ते २०१५ मध्ये ३५.६ % वर पोहोचली आहे. एनडीएच्या कार्यकाळात बिहारचे विभाजन झाल्यानंतरही भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. २००५ मध्ये मतांची टक्केवारी १०.९७% होती, जी २०१५ मध्ये २४.४२ % वर पोहोचली. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे २०१५ मध्ये भाजपाने एकूण १५७ जागांवर निवडणूक लढवली होती.

२०१५ मधील विधानसभा निवडणूक वगळाच भाजपा जेडीयूसोबतच लढली आहे. इतर पक्षांनीही जास्त जागांवर निवडणूक लढली होती, मात्र त्यांच्या मतांच्या टक्केवारीत जास्त वाढ झाली नाही.

रणनीती आखत मायावतींच्या बसपाने २०१५ मध्ये सर्वाधिक २२८ जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपाने १५७, सीपीआयने ९८, सीपीएमने ४३, काँग्रेसने ४१ आणि राष्ट्रवादीने ४१ जागांवर निवडणूक लढवली. पण काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत घट झाली.

२००५ मध्ये भाजपाने १०२ जागांवर उमेदवार दिले होते, २०१५ मध्ये ही संख्या १५७ होती. त्यावेळी त्यांची मतांची टक्केवारी १०.९७ वरुन २४.४२ % वर पोहोचली होती. काँग्रेसने २०१० मध्ये सर्वाधिक २४३ आणि २०१५ मध्ये फक्त ४१ जागांवर उमेदवार दिले. २००५ मध्ये ५% असणारी मतांची टक्केवारी मात्र फक्त ८.३७% झाली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*