विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाकारूनही काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या बातम्या काही थांबायला तयार नाहीत. उलट त्या जास्त जोराने आणि नावांच्या चर्चांसकट पुढे यायला लागल्यात. उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर आहे, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते. तर नाना पटोले विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कोणत्याही क्षणी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील, अशीही चर्चा आहे.balasaheb thorat front runner fo DyCM post in maharashtra
या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मात्र, काँग्रेसच्या पोलिटिकल अँक्टिव्हिजमबद्दल धास्ती दिसायला लागली आहे. कारण दिल्लीतले काँग्रेसश्रेष्ठी महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रही झाल्याची चर्चा जोरात पुढे आली आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केल्याचे सांगण्यात येतेय. चर्चा जर एवढ्या वरीष्ठ पातळीवर झाल्या असतील, तर त्यात राष्ट्रवादीला दोन्ही पक्षांनी स्थान ठेवल्याचे दिसत नाही. त्यातून अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल होण्याचा बाण भाजप नेते निलेश राणेंनी सोडून ठेवला आहे.
काँग्रेसश्रेष्ठी महाराष्ट्रातील नेतृत्व बदलणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून झडत असताना त्या दिशेने वेगाने पावले पडू लागली आहेत. नाना पटोवे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्यावर विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे श्रेष्ठींनी ठरविल्याची काँग्रेसच्या गोटातली माहिती आहे. त्याबाबत काँग्रेसश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केल्याने त्यातून नवा फॉर्म्युला पुढे आला आहे. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाईल आणि त्याबदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल. दोन्ही पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनीही हा प्रस्ताव मान्य केल्याचेही सांगण्यात येत आहे.
थोरातांची बाजू का जड?
काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या तिघांपैकी एकाची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात थोरातांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणूक थोरात यांच्या नेतृत्वाखाली लढविली होती. काँग्रेस आज राज्यात सत्तेत असण्यात थोरात यांचा मोठा वाटा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीशी थोरात सातत्याने समन्वय ठेवतात. त्यामुळे आघाडीतील समतोल टिकल्याचे बोलले जाते. थोरात यांच्यासाठी ही जमेची बाजू असल्याचे मानले जात आहे.