आत्मनिर्भर भारत मोहीमेचे यश, उत्पादन वृध्दीदर आठ वर्षांतील उच्चांकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत मोहीमेला उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या सप्टेंबरमध्ये भारतातील कारखाना उत्पादनाचा वृद्धीदर आठ वर्षांतील उच्चांकावर गेला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे मागणी आणि उत्पादन वाढले आहे. चीनकडून होणाऱ्या आयातीवर निर्बंध घातल्याने भारतीय उद्योजकांनी उत्पादन वाढवून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत मोहीमेला उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या सप्टेंबरमध्ये भारतातील कारखाना उत्पादनाचा वृद्धीदर आठ वर्षांतील उच्चांकावर गेला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे मागणी आणि उत्पादन वाढले आहे. चीनकडून होणाऱ्या आयातीवर निर्बंध घातल्याने भारतीय उद्योजकांनी उत्पादन वाढवून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

जगाचे उत्पादन केंद्र म्हटल्या जाणाऱ्या चीनी मालावर बहिष्कारासाठी आत्मनिर्भर भारतचा नारा पंतप्रधानांनी दिला होता. व्होकल फॉर लोकलची सादही त्यांनी घातली होती.

त्यामुळे देशातील उद्योजकांकडून उत्पादन वाढविण्यास सुरूवात झाली आहे. त्याचे प्रत्यंतर या सर्वेक्षणात आले आहे. आयएचएस मार्किटकडून जारी केल्या जाणारा ‘निक्केई मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) सप्टेंबरमध्ये वाढून ५६.८ अंकांवर गेला. ऑगस्टमध्ये तो ५२.० अंकावर होता. जानेवारी २०१२ नंतरचा हा सर्वाधिक पीएमआय आहे. ५० अंकावरील पीएमआय वृद्धी दर्शवितो.

उत्पादनाची नोंद घेणाऱ्या उप-निर्देशांकाने डिसेंबर २००७ नंतरची सर्वांत मोठी झेप घेतली आहे.

नव्या ऑर्डर्सचा विस्तार फेब्रुवारी २०१२ नंतर सर्वाधिक वेगाने होत आहे. देशांतर्गत आणि विदेशी मागणी सात महिन्यांत पहिल्यांदाच वाढली असून, त्याचा लाभ नव्या ऑर्डर्सच्या रूपाने उत्पादकांना होत आहे. सप्टेंबरमध्ये कच्च्या मालाच्या किमतींतील वाढ मंदावल्याचे दिसून आले. तरीही उत्पादकांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविल्या आहेत. सर्वेक्षणानुसार भारताचे वस्तू उत्पादन क्षेत्र योग्य दिशेने चालले आहे.

सप्टेंबरमधील पीएमआयच्या आकड्यांत उत्तम सुधारणा हे त्याचेच लक्षण आहे. कोविड-१९ लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे कारखान्यांतील उत्पादन जोरात सुरू झाले आहे. नवीन कामांतही मोठी वाढ झाली आहे. कोविड-१९ साथीबाबत अजून अनिश्चितता कायम असली तरी उत्पादक मात्र सुधारणेचा आनंद लुटत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*