अनुराग कश्यपवर कारवाई झाली नाही तर आंदोलन, रामदास आठवले यांचा इशारा

दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्री पायल घोष हिने अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप अनुराग कश्यप यांची चौकशी केली नाही. सात दिवसांत त्याच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्री पायल घोष हिने अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप अनुराग कश्यप यांची चौकशी केली नाही. सात दिवसांत त्याच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

अंधेरी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी पायल घोषही उपस्थित होती. अभिनेत्री पायल घोषच्या तक्रारीला आता सात दिवस झाले तरी कश्यप यांना चौकशीसाठीसुद्धा बोलावण्यात आले नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई केल्यास नव्या कलाकारांचे कोणीही शोषण करणार नाही. त्यामुळे येत्या सात दिवसांत अनुराग कश्यपला पोलिसांनी अटक करावी, असे आठवले म्हणाले.

अभिनेत्री पायल घोष हिनं चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पायल घोषने एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागनं माझ्यासोबत असभ्य वर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारवाई करा तेव्हाच या माणसाचे खरे रुप समोर येईल.

या ट्विटमुळे माझ्या जीवाला धोका असून माझी मदत करा, असं म्हणत तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. रामदास आठवले यांनी नुकतीच पायलची भेट घेतली. दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

आठवले म्हणाले, काही वर्षांपूर्वी पायलसोबत गैरवर्तवणूक झाली होती. याविषयी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. अद्याप अनुरागला चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाहीये. पोलिस या प्रकरणाचा तपास करताहेत. आमचा पोलिसांवर विश्वास आहे. मात्र, ऐरवी पोलिस लगेचच कारवाई करतात. अनुराग कश्यप मुंबईतच आहे तरीसुद्धा अद्याप त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाही. पायल घोषनं मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. पायलला सुरक्षा मिळेल, याविषयी मी स्वत:हून लक्ष घालणार आहे. पायलच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास यासाठी मुंबई पोलिस जबाबदार असतील. मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना याबाबत पत्र लिहणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*