नवी मुंबईत १० सेक्युलर पक्षांची युती; महाविकास आघाडीची डोकेदुखी

विशेष प्रतिनिधी 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत एकीकडे काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र येईनात तोच दुसरीकडे रिपब्लिकन सेना, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी सह १० सेक्युलर पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.Alliance of 10 secular parties in Navi Mumbai Headache of Mahavikas Aghadi

आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत आता महाविकास आघाडीतले तीन पक्ष वेगवेगळे, भाजपा आणि नवी मुंबई विकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेली नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष संघटनांनी या निवडणुकीत उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप-आरपीआय आठवले गटाला धूळ चारण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीने जोरदार फिल्डिंग लावताना भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याची मोहीम हाती घेतली असून सध्या या दोन्ही पक्षात फोडाफोडीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

तर दुसरीकडे नवी मुंबईच्या झोपडपट्टी विभागात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या रिपब्लिकन सेना, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी लालबावटा, घर हक्क संघर्ष समिती, सोशालिस्ट पार्टी, आरपीआय आर.के गट, जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र जनशक्ती सेना, सीपीएम या सेक्युलर पक्ष व संघटनांना महविकास आघाडी विचारात घेत नसल्याने या १० सेक्युलर पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.गुरुवारी या सेक्युलर पक्ष्यांच्या प्रतिनिधींची बैठक बेलापूर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत एकत्र आलेल्या १० सेक्युलर पक्षांनी नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई प्रमुख तथा नवी मुंबई विकास आघाडीचे सदस्य खाँजामिया पटेल यांनी सांगितले.

१० फेब्रुवारीला लोकार्पण

येत्या १० फेब्रुवारी रोजी नवी मुंबई विकास आघाडीचा लोकार्पण सोहळा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी होणार असून यावेळी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील तसेच इतर पक्ष व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई विकास आघाडी सर्व १११ जागा लढवत असून सेक्युलर पक्षांच्या नवी मुंबई विकास आघाडीने उडी घेतल्याने ही यावेळची निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

Alliance of 10 secular parties in Navi Mumbai Headache of Mahavikas Aghadi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*