८ महिन्यांची “नागरिकता” अजूनही भारतीयत्वाच्या प्रतिक्षेत; दिल्लीच्या पाकिस्तानी हिंदू निर्वासितांची व्यथा

  • CAA मंजूरीनंतर आधारकार्डे बनली, पण हजारो पाकिस्तानी हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकता कधी मिळणार?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आठ महिन्यांची “नागरिकता” अजूनही भारतीय ओळखीच्या प्रतिक्षेत आहे. CAA कायद्याच्या मंजूरीनंतर मिठाई खाऊन झाली. ती पचली. पण भारतीय नागरिकता अजून काही मिळाली नाही. ही व्यथा आहे, दिल्लीत राहणाऱ्या हजारो पाकिस्तानी हिंदू निर्वासितांची…!!

भारतात २०१९ च्या डिसेंबरमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा अर्थात सीएए मंजूर झाला. काहींनी या कायद्याचे समर्थन केले तर काहींनी विरोध. शेजारील राष्ट्रांमध्ये राहणाऱ्या हिंदूंवर अत्याचार होत असतील तर त्यांना कागदपत्रांविना थेट भारताचे नागरिकत्व दिले जाईल, असे आश्वासन यातून सरकारने दिले होते. याच आनंदात पाकिस्तानातून भारतात आलेल्या एका हिंदू कुटुंबाने त्याच दिवशी जन्मलेल्या आपल्या मुलीचे नाव ‘नागरिकता’ असे ठेवले. तिच्यावर देखील भरपूर बातम्या झाल्या. परंतु, या कायदा मंजूर होऊन आणि नागरिकता हिला जगात येऊन ८ महिने झाले तरीही तिला अद्याप नागरिकत्व मिळालेले नाही. दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे.

हे निर्वासित कुटुंब दिल्लीतील मजनू टीला येथील एका झोपडपट्टीत राहात आहे. यमुनेकिनारी पााकिस्तानातून आलेली अशीच १५० हून अधिक निर्वासित हिंदू कुटुंबे राहतात. यासोबतच दिल्लीचे आदर्श नगर, रोहिणी, सिग्नेचर ब्रिज आणि फरीदाबाद येथे सुद्धा पाकिस्तानातून आलेले हिंदू थांबले आहेत. या कुटुंबांची संख्या ७५० च्या घरात आहे.

नागरिकताची आई मीरा देवी सांगते, की नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर मुलीच्या आजीने तिचे नामकरण केले होते. आम्हाला या कायद्यातून खूप अपेक्षा होत्या. मिठाई वाटण्यात आली आणि तो दिवस आमच्यासाठी उत्सवच होता. परंतु, आजही आम्ही काहीच बदल पाहिलेला नाही. नदीकाठी बनलेल्या या झोपडपट्टीत गेल्या अनेक दिवसांपासून बेघर लोक राहत आहेत. या झोपड्या अगदी चिखलात आहेत. या ठिकाणी काही शौचालये सुद्धा होती. परंतु, पाकिस्तानातून 150 कुटुंब या ठिकाणी आल्याने आता ती शौचालये कमी पडत आहेत. बहुतांश लोक शौचासाठी यमुना नदीकाठी जाण्यास मजबूर आहेत.

वस्तीत राहणे अवघड, रोज निघतात साप-विंचू

वस्तीचे प्रमुख सोना दास यांच्या मते, आम्ही ज्या ठिकाणी राहतो तेथे वीज आणि मूलभूत व्यवस्था नाहीत. आकडे टाकून कशी-बशी वीज मिळते. त्यात पण वारंवार त्रास होतो. दिल्ली जल बोर्डाने पाणी दिले पण जंगलासारख्या भागात राहणे खूप कठिण आहे. साप विंचू रोज निघतात. सोना दास बोलतच होते, तेवढ्यात मुलांचा टोळका काठ्या आणि लोखंडी पाइप घेऊन ओरडत निघाला. परिसरात एक साप दिसला होता. त्यातच एक व्यक्ती ज्ञान चंदने सांगितले की मी एक साप या पाइपमध्ये पकडला आहे. आता ते सापाला जंगलात सोडण्यासाठी जात आहेत आणि त्यांच्यामागे मुलांचे टोळके जल्लोषात निघाला.

या परिसरात एका मंदिराचे काम सुरू आहे. महादेव अाडवाणी त्याची देखरेख करत आहेत. महादेव सांगतात, मंदिर निर्मितीसाठी काहीच अडचण आली नाही. मंदिर बनवताना स्थानिक प्रशासनाचे लोक ते थांबवण्यासाठी आले होते. आम्ही त्यांना सांगितले की पाकिस्तानात तर मंदिर तोडलेच आता हिंदुस्थानातही मंदिर बांधू शकत नाही का? खूप मेहनत घेतली आणि आता मंदिराचे काम पूर्णत्वाकडे आहे. १९९२ मध्ये भारतात बाबरी ढांचा पाडण्यात आले तेव्हापासून पाकिस्तानात हिंदूंचे राहणे खूप कठिण झाले होते. त्यामुळेच आम्हाला भारतात यावे लागले.

२०११ मध्ये तीर्थयात्रेच्या नावे आले ते परतलेच नाही

तीर्थयात्रेच्या नावे या लोकांनी भारताचा व्हिसा घेतला आणि कधीच पाकिस्तानात परतले नाहीत. येथील बहुतांश लोक सिंध प्रांतातून २०११ मध्ये आले होते. सुरुवातीला या लोकांना भारतात राहण्यासाठी काहीच नव्हते. यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांना पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण, बिजवासन येथील रहिवासी नाहर सिंह यांनी या कुटुंबियांना दत्तक घेतले आणि दीड वर्षांपर्यंत त्यांनीच या लोकांची देखभाल केली. यानंतर या लोकांनी ठिक-ठिकाणी झोपड्या टाकून राहण्यास सुरुवात केली.

काहीच सुविधा नाहीत, तरीही भारतात आल्याचे सामाधान

पाकिस्तानी महिला केवकी ७ महिन्यांपूर्वीच येथे आली. तिची भाषा अजुनही पाकिस्तानी आहे. तिचे आई-वडील अजुनही पाकिस्तानातच आहेत. ती आपल्या आई-वडिलांना अब्बू आणि अम्मी म्हणते. वस्तीचे प्रमुख दास यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकारने आमच्या राहण्याची आणि नागरिकत्वाची व्यवस्था करावी असे वाटते. तरीही किमान भारतात आलो आणि या ठिकाणी आमच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत एवढेच समाधान वाटते. मीरा देवी सांगते, की पाकिस्तानात असताना हिंदू सण आणि उत्सव काय असतात हे माहितीच नव्हते. होळी, दिवाळी, जन्माष्टमी काय असतात हे फक्त फोटोंमध्ये पाहिले होते. ते काय असतात हे या ठिकाणी येऊन पाहिले.

आधार कार्ड बनले पण पासपोर्टवर अजूनही पाकिस्तानी

या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अजूनही भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. बहुतांश शरणार्थींचे आधार कार्ड बनवून देण्यात आले आहेत. परंतु, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांवर ते आजही पाकिस्तानीच आहेत. भारताचे नागरिकत्व मिळाले नसल्याने ते या परिसरातून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. येथील अनेक जण धार्मिक यात्रा करू इच्छितात, पण पाकिस्तानी असल्याने त्यांना दिल्लीतून बाहेर पडता येत नाही.

एकीनेच केले 10 वी पर्यंतचे शिक्षण, सीएएच्या नावावर केवळ राजकारण

नागरिकत्व नसल्याने येथील कुणालाही सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही. त्यातही कोणत्याही मुलाला शिक्षणही करता येत नाही. या ठिकाणी राहणाऱ्या फक्त एका मुलीने १० वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणाची व्यवस्था नसल्याने अनेक लहान मुले कामाला लागले आहेत. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकतात तर काही मजुरी करतात. सीएएच्या नावावर राजकारणच झाले. देशाच्या अनेक भागांमध्ये दंगली देखील पेटल्या. कित्येक लोकांचा जीव गेला. परंतु, ज्यांच्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला ते मजनू टिला परिसरात तसेच आहेत. ते आजही पाकिस्तानीच आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*