२६०० विदेशी तबलिगींची खटले संपेपर्यंत भारतातून सुटका नाही

  • केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
  • १९०५ विदेशी तबलिगी अद्याप फरार; भारतातच लपले आहेत; लुक आऊट नोटीस जारी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात सामील झालेल्या २६०० पेक्षा जास्त विदेशी तबलिगींना खटले संपेपर्यंत त्यांच्या देशात परत जाता येणार नाही. त्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने या संदर्भातले प्रतिज्ञापत्र सुप्रिम कोर्टात सादर केले आहे. त्यानुसार भारतातील ज्या राज्यात तबलिगींविरोधात खटले सुरू आहेत ते संपेपर्यंत त्यांना भारत सोडता येणार नाही. १९०५ विदेशी तबलिगी फरार आहेत. त्यांच्या संदर्भात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

गेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारकडून या प्रकरणी उत्तर मागितले होते आणि सुनावणी २ जुलैपर्यंत पुढे ढकलली होती. आता या प्रकरणी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर केले आहे.

प्रतिज्ञा पत्रात काय म्हटले आहे?

कोरोना काळात भारत सरकारने दिलेले निर्देश, राज्य सरकारांनी आणि पोलिसांनी दिलेले आदेश यांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे तबलिगींवर आहेत. विविध राज्यांमध्ये हे गुन्हे दाखल आहेत. त्यांची सुनावणी होणे अद्याप बाकी आहे. केंद्र सरकारने तबलिगी जमातच्या हजारो जणांना काळ्या यादीत टाकलं असून त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे या प्रकरणांची सुनावणी होईपर्यंत परदेशांतून जे तबलिगी भारतात आले आहेत त्यांना आपला देश सोडता येणार नाही.

दरम्यान, तबलिगी समाजाने सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत त्यावरची सुनावणी १० जुलैला होणार आहे. आत्तापर्यंत २६७९ तबलिगींचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. २७६५ जणांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. २०५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९०५ फरारी तबलिगींविरोधात लुक आऊट नोटीसही लागू करण्यात आली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*