२०२९ – २० मध्ये दोन हजाराची एकही नवी नोट छापली नाही!

भारतीय रिझर्व्ह बँकने २०१९ – २० मध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.


वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकने २०१९ – २० मध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केलेली नाही. दोन हजारांच्या नोटांचा चलनातील वापर कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालानुसार, २०१८ मार्चच्या अखेरीस चलनात असेलल्या २००० रुपयांच्या नोटांची संख्या ३३,६३२ लाख होती, मात्र मार्च, २०१९ च्या अखेरपर्यंत त्यात घट होऊन ३२, ९१० लाखांवर आली. मार्च, २०२० च्या अखेरीस चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या आणखी कमी होऊन २७,३९८ लाखांवर आली.

चलनातील एकूण नोटांमध्ये मार्च २०२० च्या अखेरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांचा वाटा २.४% राहिला. मार्च २०१९ च्या अखेरीस हा वाटा ३% तर मार्च २०१८ च्या अखेरपर्यंत ३.३% होता, असेही आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे.

मूल्याच्या हिशेबानेही २००० रुपयांच्या नोटाचा वाटा घटला आहे. आकडेवारीनुसार मार्च, २०२० पर्यंत चलनातील एकूण नोटांच्या मूल्यामध्ये २ हजार रुपयांच्या नोटांच्या वाट्यात घट होऊन २२.६% राहिला आहे. २०१९ मार्च अखेरीस ३१.२% आणि २०१८ मार्च अखेरीस तो ३७.३% होता.

२०१८ पासून तीन वर्षांत ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांच्या चलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे. मूल्य आणि प्रमाण या दोन्हीच्या बाबतीत ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे चनल वाढले आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

२०१९ – २० मध्ये दोन हजारांच्या नोटांच्या छपाईसाठी ऑर्डर दिलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँक नोट प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड तसंच सिक्युरिटी प्रिटिंग अँड मींटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून दोन हजारांच्या नोटांची कोणतीही नवी पूर्तता झालेली नाही. बँक नोटांची ऑर्डर मागील एक वर्षाच्या तुलनेत १३.१% कमी होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*