हुजऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर कपील सिब्बल यांचा निशाणा, आमच्यावर हल्ले होत असताना बचावासाठी कोणीही पुढे आले नाही

कॉंग्रेसच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची मागणी करणाऱ्या २३ ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले कपील सिब्बल यांनी हुजऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. आमच्यावर हल्ला होत असताना एकाही सदस्याने आमच्या बचावासाठी एक शब्ददेखील उच्चारला नाही, अशी खंत सिब्बल यांनी व्यक्त केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची मागणी करणाऱ्या २३ ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले कपील सिब्बल यांनी हुजऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. आमच्यावर हल्ला होत असताना एकाही सदस्याने आमच्या बचावासाठी एक शब्ददेखील उच्चारला नाही, अशी खंत सिब्बल यांनी व्यक्त केली आहे.

आयुष्यभर कॉंग्रेसचे काम करणाऱ्या २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. यामध्ये पक्ष वाचविण्यासाठी अनेक मुद्दे सुचविले होते. मुख्य म्हणजे राहुल गांधी यांचे नेतृत्व कॉंग्रेसला पुन्हा एकदा सत्तेवर आणू शकत नाही, असे त्यांनी सुचकपणे म्हटले होते. मात्र, त्यानंतर नेहरू-गांधी घराण्याची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणाऱ्या नेत्यांनी या नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली.

याबाबतच आपली खंत व्यक्त करताना सिब्बल म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत आमच्यावर हल्ले होत असताना उपस्थित एकाही सदस्याने आमच्या बचावासाठी एक शब्द देखील उच्चारला नाही, काँग्रेस पक्ष नेहमीच भारतीय जनता पक्षावर राज्यघटनेचे पालन न करणे आणि लोकशाहीचा पाया नष्ट करण्याचे आरोप करत आला आहे. आम्हाला काय हवे आहे? आम्ही पक्षाच्या घटनेचे पालन करू इच्छितो. त्यावर कोण आक्षेप घेऊ शकेल.

काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काय मजकूर आहे, याबाबत काँग्रेस कार्यकारी समितीला कल्पना दिली गेली पाहिजे होती, असे सांगून सिब्बल म्हणाले. ही मूलभूत गोष्ट आहे आणि ती व्हायला हवी होती. हे पत्र २३ लोकांनी लिहिले आहे. आम्ही लिहिलेल्या मजकुरात काही चुकीचे असेल तर त्याबाबत आमची नक्कीच चौकशी होऊ शकते. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत या पत्रावर चर्चा करण्यात आली नाही. बैठकीदरम्यान आम्हाला देशद्रोही म्हटले गेले आणि नेतृत्वासह त्या बैठकीला हजर असलेल्या एकाही सदस्याने एक शब्द काढला नाही. आमच्या पत्राचा मजकूर अतिशय सुसंस्कृत भाषेत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*