सिब्बल, आझादांना भाजपमध्ये घेण्यास रामदास आठवले तयार

  • स्वत:च्या रिपब्लिकन पक्षात घ्यायचे सोडून आठवले त्यांना भाजपमध्ये का पाठवताहेत?; सोशल मीडियात चर्चा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये घेण्याची ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

आझाद आणि सिब्बल ही नावे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांची निवड करण्यात यावी, असं मागणी करणारं पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये दोघेही होते. आझाद आणि सिब्बल यांच्यावर पक्षातून टीका झाली. या टीकेचा हवाला देत या दोन्ही नेत्यांना काँग्रेस सोडून भाजपात येण्याची ऑफर आठवलेंनी दिली आहे. पण या हे नेत्यांना स्वत:च्या रिपब्लिकन पक्षात घ्यायचे सोडून आठवले त्यांना भाजपत का पाठवत आहेत?, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.

काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रावर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्याही स्वाक्षऱ्या होत्या. या पत्रानंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दोन्ही नेत्यांवर टीका झाली. मात्र, नंतर त्यावर पक्षाकडून आणि दोन्ही नेत्यांकडून पडदा टाकण्यात आला.

या पक्षातंर्गत वादानंतर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांना रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. “काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांनी प्रचंड मेहनत घेतली. जर राहुल गांधी त्यांच्यावर आरोप करत असतील, तर त्यांनी पक्ष सोडावा. भाजपामध्ये त्यांचे स्वागत करण्यास तयार आहोत,” अशी ऑफर आठवले यांनी दिली आहे.

काय म्हटलं होतं पत्रात?

काँग्रेस पक्षामध्ये बदल करण्याची मागणी करणारं हे पत्र १५ दिवसांपूर्वी देण्यात आलं आहे. या पत्रामध्ये या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला असून, “पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी व लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी. पक्षामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा करण्याबरोबरच, सत्तेचे विकेंद्रीकरण, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, प्रत्येक स्तरावर पक्षातंर्गत निवडणूका, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ घटना तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या घसरणीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पक्षाने प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले नाही,” असे या नेत्यांनी म्हटले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*