सामनाकारांची लेखणी घसरली; पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली पत्ते पिसण्याची उपमा


  • “महाआघाडीने एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत हे स्पष्ट दिसते” : शिवसेना
  • बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सामनाकार पत्ते पिसण्याएवढे किरकोळ समजत असल्याची हीन मानसिकता त्यांनीच समोर आणली आहे. बदल्यांमधल्या राजकारणावरून भाजप विशेषत: देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना सामनाकारांची लेखणी घसरली आहे.

“राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत हे स्पष्ट दिसते,” अशा भाषेत त्यांनी बदल्यांचे वर्णन केले आहे. महाराष्ट्रातल्या मोठ मोठ्या शहरांमधल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना पत्ते पिसण्याएवढीच किरकोळ किंमत असल्याची हीन मानसिकता सामनाकारांनी दाखवून दिली अाहे. यात जनतेने मतदानातून विरोधी बाकांवर बसवलेल्या परंतु, शिवसेनेबरोबर पाट लावून सत्तेच्या खुर्च्यांवर बसलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचीही मानसिकता सामनाकारांनी उघड करून दाखविली आहे.

कोणत्याही कुरबुरी न होता हे बदल झाले, असा दावाही सामनाच्या अग्रलेखात केला आहे. बाकी विरोधक काय बोलतात व टीका करतात याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदल्यांचा धंदा करत असल्याचा आरोप केला होता. मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले. आता कर्तबगारी, राज्याची गरज पाहून नेमणुका झाल्या. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी सरकारचा व्यवहार जनतेच्या सुरक्षेशी असतो, त्याबाबत व्यवहार चोख झाला आहे असे सांगता यावे अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत असा दावाही अग्रलेखात केला आहे.

पोलीस दलात प्रथमच मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यावर विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे टीकेचे तुणतुणे वाजविले आहे. सरकारला बदल्यांशिवाय दुसरे काहीच काम नाही किंवा बदल्यांचे दुकान उघडले आहे असे नेहमीचेच ठेवणीतले टीकास्र सोडले आहे. चंद्रकांतदादा पाटील वगैरे नेत्यांनी त्याहीपुढे जाऊन टीकेच्या डफावर थाप मारत सांगितले आहे की, ‘‘थांबा, आता बदल्यांमागचा हिशेबच जाहीर करतो.’’ हिशेबाची वही आधीच्या सरकारने ठेवली असावी असे एकंदरीत पाटलांच्या विधानावरून दिसते असा टोला सामनाकारांनी लगावला आहे.

बदल्यांचा आदेश निघाल्यापासून विरोधी पक्षांचा गुदमरलेला श्वास पाहता सरकारने पोलिसांच्या बदल्या करून चांगलेच केले हे मानायला जागा आहे. यापैकी बहुतेक अधिकारी फडणवीस सरकारच्या काळात नेमलेले होते व सरकारने ‘शपथ’ घेताच या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलावे अशी जोरात मागणी असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात-आठ महिने कोणत्याही प्रमुख अधिकाऱ्यास हात लावला नाही. परंतु, पोलिस महासंचालकांनी मध्यंतरी थेट उद्धव ठाकरेंना फोन करून बदली आदेशांवर सह्या करण्यास नकार दिला होता, याकडे सामनाकारांनी सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे.

कोविड काळात याच अधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी संकटाचा सामना केला. प्रशासन हे लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे ते नसते. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवला हे महत्त्वाचे. पहिल्या महिनाभरातच त्यांना बदल्या करता आल्या असत्या, पण त्या केल्या नाहीत. बदल्यांच्या दुकानदारीची प्रथा सरकारला पाडायची नसावी, असा दावाही अग्रलेखातून केला आहे.

आता ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्याचा अभ्यास विरोधकांनी केला तर इतक्या पारदर्शक बदल्या व नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत याची खात्री त्यांना पटेल, असा अजब दावाही सामनाकारांनी अग्रलेखात केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था