सांगली कलेक्टर ऑफिससमोर कोरोना रुग्णांचे मृतदेह घेऊन बसू; खासदार संजयकाका पाटलांचा इशारा

सांगली जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा मृत्यू दर राज्याच्या दुप्पट


वृत्तसंस्था

सांगली : सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीवरून भाजपा खासदार संजयकाका पाटील प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. सांगली जिल्ह्यात उपचाराविना रोज रुग्ण मरत आहेत, असा आरोप करत प्रशासनाच्या अनागोंदी कारभार विरोधात मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्हाधिकारी हे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप सुद्धा केला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ कायम आहे. एकीकडे रुग्ण वाढत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सांगली जिल्ह्याचा मृत्यू दर राज्याच्या दुप्पट असल्याचे जाहीर करत प्रशासनाची कानउघाडणी केली होती. मात्र तरीही जिल्ह्यातील कोरोना व उपचार पद्धतीवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे.

बेड आणि वेळेत उपचार मिळत नसल्याने इतर रुग्णांच्या मृत्यू संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे, यामुळे जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता मृत्यूच्या छायेखाली जगत असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले. खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर निशाणा साधला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना आणि मृत्यूचा परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेक रुग्णांना उपचाराविना मरावे लागत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य रुग्णांची सुद्धा मोठी फरफट सुरू असून कोरोना नसलेल्या रुग्णांना सुद्धा वेळेत उपचार आणि बेड मिळत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे आणि ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई-पुणे व बाहेरच्या ठिकाण असणारी अतिरिक्त डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना पाचारण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कोरोना रुग्णालय निर्माण होणे गरजेचे आहे, मात्र याउलट प्रशासनाचा कारभार सुरू असल्याची टीका खासदार पाटील यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि प्रशासनाकडे वारंवार कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत आपण सूचना करत आहोत, मात्र जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा आरोपही खासदार पाटील यांनी केला आहे. सध्या जिल्ह्यातला आरोग्य बाबतीत प्रशासनाचा सुरू असलेला अनागोंदी कारभार, येत्या काही दिवसात सुधारला नाही आणि रुग्णांचा मृत्यू असाच सुरू राहिला तर आपण स्वतः मृतदेह घेऊन सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू,असा इशारा खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह प्रशासनाला दिला आहे.

शासकीय यंत्रणेला कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना आठ – आठ तास फिरावे लागत आहे. कोरोना विरोधातील लढ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांना सामावून घेणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. त्याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करणे आवश्यक आहे. मात्र हे न झाल्याने सांगली, मिरजेतील रुग्णालयांवर ताण येत आहे. मुंबईतील कोरोना आटोक्यात आला आहे. त्यामुळे तेथील डॉक्टर, सिस्टर, ब्रदर व इतर स्टाफ बोलावून घ्या. पण, येत्या दोन दिवसांत ही स्थिती सुधारली पाहिजे असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

कोरोना रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक संख्या नोंद

सांगली जिल्ह्यात गुरुवारी कोरोना रुग्ण आणि मृत्यूची रेकॉर्ड ब्रेक संख्या नोंद झाली आहे. दिवसभरात ५२७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी ३०२ रुग्ण हे सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत, ज्यामध्ये १९८ सांगली शहरातील तर १०४ हे मिरज शहरातील आहेत. तर २३८ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या कोरोना रुग्णांच्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना संख्या ही ३ हजार ४८१ तर आज पर्यंतचा एकूण आकडा हा ९ हजार ९४१ झाली आहे ,तर आता पर्यंत ६ हजार ४८ कोरोना मुक्त, आणि आज अखेर ४१२ जणांचा मृत्यु झाला आहे ,तसेच ४७७ जण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*