राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातही कोविड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातही कोविड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रासमोर चीनी व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकारण दूर ठेवून एकत्र येऊया, असे आवाहनच राज्य सरकारला केले आहे.
पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेली चीनी व्हायरस महामारीची समस्या कमी होताना दिसत नाही, उलट परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करू या. राज्यात चीनी व्हायरसचे संकट गंभीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि या परिस्थितीत सातत्यपूर्ण काम करणार्या काही प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विविध राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना, इस्कॉन, टाटा ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी असे आपण सर्वजण एकत्रितपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे, यावरील उपाययोजना ठरविणे आणि कामाची वाटणी करणे हे खूप आवश्यक आहे.
सध्याचे संकट पाहता दोन हजार लोकसंख्येच्या गावातही आॅक्सिजन बेडसह सुसज्ज रुग्णालय उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच सुविधा निर्माण करताना तेथे वैद्यकीय, निमवैद्यकीय व पूरक सेवा देण्याची कर्मचार्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी एक वर्षांसाठी नियुक्ती करण्याची गरज आहे, असा सल्लाही पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये ११०० रुग्ण बरे झाले आहेत. आजही ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. तरीही ६ महिन्यामध्ये सरकारकडून त्यांना फक्त ४४ हजार रुपये मिळाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांकडून सहकार्याची अपेक्षा तरी कशी ठेवायची? असा सवालही पाटील यांनी केला आहे.