शेतकऱ्यांना दिलासा, धान खरेदीला केंद्राची ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

  • फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार

वृत्तसंस्था

मुंबई : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केंद्राकडे मागणी केलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदीला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनीही दिली आहे.

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इ. जिल्ह्यात रबी हंगामाचे उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता शासनाकडून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेले आहेत. या शासकीय धान खरेदी केंद्रावर प्रशासनाकडून ३० जूनपर्यंत धानाची खरेदी केली जाणार होती.

मात्र यावेळी उन्हाळी धान पिकांचे विदर्भात मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान अजून त्यांच्याकडे पडून आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडून त्यांचे आर्थिक नुकसान होणार होते. त्यामुळे धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. याचा पाठपुरावा फडणवीस यांनी केला होता.

केंद्र शासनाने धान खरेदीला मुदतवाढ दिल्यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत गहू खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ केंद्र शासनाच्या विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील रबी हंगामातील गव्हाची खरेदी केली जात आहे.

या खरेदीला एक महिना मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केलेली मागणी केंद्राकडून मंजूर करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये पहिल्याच वेळी केंद्र शासनाच्या विकेंद्रित खरेदी योजने अंतर्गत गव्हाची खरेदी केली जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*