शिवसेनेचे कोकणवासियांबद्दलचे प्रेम पुतना मावशीसारखेच, प्रविण दरेकर यांची टीका

महाविकास आघाडी सरकारने दाखवलेल्या उदासीनतेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेनेचे कोकणवासीयांबद्दलचे प्रेम पुतना मावशीसारखे असल्याचे सिद्ध झाले आहे, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने दाखवलेल्या उदासीनतेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेनेचे कोकणवासीयांबद्दलचे प्रेम पुतना मावशीसारखे असल्याचे सिद्ध झाले आहे, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

दरेकर म्हणाले की, चीनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लोकांना विलगीकरण काळासाठी १२ ऑगस्टपूर्वी पोहोचणे गरजेचे होते. तशी नियमावली खुद्द राज्य सरकारने घोषित केली होती. त्यानुसार रेल्वेने २३ जुलै रोजी विशेष रेल्वे सोडण्याची तयारी दर्शविली होती. पण राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही विशेष रेल्वे वेळेत सुरू होऊ शकली नाही.

रेल्वेने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने या रेल्वेस मंजूरी दिली. परंतू विलगीकरणाच्या अटीमुळे बहुतांशी लोकांनी आर्थिक भुर्दंड सहन करत खासगी वाहनांनी किंवा एसटी बसने प्रवास केला. परिणामी उशीरा सोडण्यात आलेल्या रेल्वे गाड्यामध्ये सरासरी फक्त 80 प्रवासी कोकणात गेले. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांचा फायदा प्रत्यक्ष कोकणवासीयांना झाला नाही.

१२ ऑगस्टपर्यंत अधिकाधिक लोक कोकणात पोहचल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी घोषीत करण्याचा दिखाऊपणा राज्य सरकारने केला. या टोलमाफीचा फायदा चाकरमान्यांना कसा मिळणार असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला. प्रत्यक्ष टोल माफी साधारण 100-200 रुपये प्रत्येक वाहनाला मिळू शकते. पण कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या कोविड तपासणीचा खर्च मात्र प्रत्येकी अडीच हजार रुपये इतका आकारण्यात आला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीची कोकणवासीयांच्या प्रती असलेली लबाडी उघड झाली आहे.

दरेकर म्हणाले की, गणेशोत्सवाकरिता साधारण तीन लाख चाकरमानी मुंबईतून कोकणात यंदा गेले आहेत. राज्य सरकारने या चाकरमान्यांवर कोविड तपासणीचा भुर्दंड आणि एसटी प्रवासाचा खर्च हा प्रत्येक चाकरमान्यामागे साधारण तीन हजार रुपये गृहीत धरला तर साधारण सरकारला १०० कोटींचा खर्च आला असता. परंतू ज्या कोकणाने शिवसेनेला व सरकारला भरभरून दिले त्या सरकारला कोकणातील चाकरमान्यांसाठी १०० कोटी रूपयांचा छोटासा आर्थिक भार सोसता आला नाही हे कोकणवासीयांसाठी दुर्दैवी आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या या अजब कारभारामुळे त्यांचे कोकणवासीयांच्या प्रती असलेले पुतना मावशीचे प्रेम दिसून आले. शिवसेनेच्या स्थापनेपासून ज्या कोकणवासीयांनी व चाकरमान्यांनी शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला जास्तीत जास्त नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री दिले त्याच कोकणाला शिवसेनेने सापत्नकपणाची वागणुक दिली. आगामी काळात ज्या कोकणवासीयांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले त्या शिवसेनेला कोकणात भारी किंमत चुकवावी लागेल असे दरेकर म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*