शिवसेना खासदार संजय जाधवांचा थेट राजेश टोपेंवर निशाणा

  • “स्थानिक राष्ट्रवादीचे सोडा, राजेश टोपेंकडूनही न्याय मिळत नाही”

वृत्तसंस्था

परभणी : राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवणारे शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी अाता ठाकरे – पवार सरकारमधील आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर थेट निशाणा साधला आहे.

एबीपी माझाने संजय जाधवांशी बातचीत करून बातमी दिली आहे. जाधव यांनी राष्ट्रवादीसह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. आपण शिवसेनेतच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. जाधव म्हणाले, “जिल्ह्याचे प्रश्न सुटत नसतील तर मी जरी पक्षाचा असलो तरी मला लोकांसाठी लढा उभारावा लागेल. त्यामुळे उद्यापासून परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७० : ३० च्या आरक्षणाविरोधात लढा उभारणार आहे.”

जाधव पुढे म्हणाले, “बाजार समित्या असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच ठिकाणी सर्वांना सामान वाटा मिळायला हवा. मात्र असे काही होत नाही. याच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या गंगाखेड येथील विधानसभा प्रमुखांना फूस लावली आणि रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना सोबत घेऊन गंगाखेड मधील बाजार समितीतही आपले प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला. ही बाब मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घातली. तेव्हा त्यांनी यात मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येतील असं काही करू नये.”

जाधव यावेळी म्हणाले की, परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं, यासाठी आम्ही लढा उभारला. मंजूर करून घेतले, मात्र आता त्यात काहीही होत नसल्याने जनभावना लक्षात घेऊन मी पक्षाचा खासदार असलो तरी मला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७० : ३० चे आरक्षण रद्द करण्यासाठी उद्यापासून आंदोलन उभारावं लागत आहे. मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदारांनी येत्या अधिवेशनात हा विषय मांडून उद्या सर्वच जिल्ह्यात हे आंदोलन करावे, असे माझे आवाहन आहे.”

धुसफूस कायम

राज्यातील महाविकास आघाडीत सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचा दावा वरिष्ठ नेते करीत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दरी रूंदावते आहे. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे खासदार आणि आमदार हा शिवसेनेचा असतो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ह्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे असतात हे आजपर्यंतचे सूत्रच आहे. त्यामुळे इथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्राबल्य स्थानिक पातळीवर अधिक आहे. आता तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या तिन्ही पक्षांची ताकत वाढली असली तरी नेत्यांमधील धुसफूस आणि विरोध आजही कायम असल्याचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक आणि जिंतूर बाजार समिती प्रशासक नेमण्यास स्थगितीवरून स्पष्ट झाले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*