शांततेवर विश्वास, पण कोणी दु:साहस केल्यास सडेतोड उत्तर, राष्ट्रपतींचा इशारा

कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक समुदायाने एकजूट होऊन लढण्याची गरज असताना शेजारी देशांनी त्यांच्या कारवाया चालूच ठेवल्या आहेत. भारताचा शांततेवर विश्वास आहे; परंतु कोणी दु:साहस करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असा इशारा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला आहे.


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक समुदायाने एकजूट होऊन लढण्याची गरज असताना शेजारी देशांनी त्यांच्या कारवाया चालूच ठेवल्या आहेत. भारताचा शांततेवर विश्वास आहे; परंतु कोणी दु:साहस करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असा इशारा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जगभरात हाहाकार माजवणाºया कोरोना महामारीशी लढण्यात भारताने बजावलेल्या सुपर ह्युमन कामगिरीची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. ते म्हणाले, या विषाणूविरुद्धच्या आपल्या लढ्यात पहिल्या फळीत राहून अविश्रांत कष्ट करणारे आपले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचा देश ऋणी आहे. दुदैर्वाने, या महामारीशी लढतांना त्यांच्यापैकी कित्येकांना आपले जीव गमवावे लागले. ते आपल्या देशाचे नायक आहेत. हे सर्व कोरोनायोद्धे मोठ्या कौतुकास पात्र आहेत.

त्यांनी आपल्या कर्तव्याच्या कितीतरी पलीकडे जात लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट केले. जेव्हा शहरे आणि गावे शांत असतात आणि रस्ते ओसाड पडतात, अशावेळी हे लोक अविश्रांत काम करुन कोणीही आरोग्य सुविधा आणि सेवेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतात.

राष्ट्रपती म्हणाले, आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या मूल्यांनी आधुनिक भारताचा भक्कम पाया रचला आहे. आपल्या द्रष्ट्या नेत्यांनी बहुविध विचार एकत्र करुन, देशात राष्ट्रीयत्वाची समान उर्जा निर्माण केली. जुलमी दडपशाहीच्या परदेशी राजवटीतून भारतमातेला स्वतंत्र करण्याच्या आणि तिच्या सुपुत्रांचेभविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्दिष्टासाठी ते सर्व कटिबद्ध होते. त्यांच्या विचार आणि कायार्नेच, जगात एक आधुनिक देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.

आपण अत्यंत नशीबवान आहोत की महात्मा गांधी या स्वातंत्र्यलढयाचे दीपस्तंभ म्हणून आपल्याला लाभले. आज सामाजिक कलह, आर्थिक समस्या आणि हवामान बदल अशा प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या जगासाठी महात्मा गांधींची शिकवण हा एक मोठा दिलासा आहे. न्याय आणि समानतेसाठीचा त्यांचा आग्रह हा आपल्या प्रजासत्ताकासाठीचा मंत्र ठरला आहे. आजची नवी पिढी महात्मा गांधींचा नव्याने शोध घेत आहे, हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे सोहळे मर्यादित स्वरुपात होणार असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, संपूर्ण जग एका अत्यंत धोकादायक विषाणूचा सामना करत आहे, या विषाणूने आपले जीवनमान विस्कळीत केले आहे, आणि त्याची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागते आहे. या विषाणूमुळे, आपले कोरोना साथीच्या पूर्वी असलेले जग बदलून गेले आहे. या अत्यंत मोठ्या आव्हानाचा पूर्व अंदाज घेत, केंद्र सरकारने योग्य वेळी अनेक प्रभावी पावले उचलली ही बाब अत्यंत दिलासादायक आहे.

भारतासारख्या इतक्या विशाल आणि वैविध्यपूर्ण, तसेच लोकसंख्येची घनता असलेल्या देशात, अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी असामान्य प्रयत्नांची गरज आहे. सर्व राज्य सरकारांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या. लोकांनीही सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य केले. आपल्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे, आपण या जागतिक साथीच्या आजाराचा प्रभाव आटोक्यात आणण्यात आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत, ही जगासाठी देखील अनुकरणीय बाब आहे. या आजाराचा सर्वात मोठा फटका गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांना बसला आहे. या संकटकाळात या सर्वांना आधार देण्यासाठी, विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांसह, सरकारने काही कल्याणकरी उपक्रमही हाती घेतले आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा करत, केंद्र सरकारने कोट्यवधी लोकांची उपजीविका चालेल अशी व्यवस्था करत बेरोजगारीचे संकट आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सरकारने इतर अनेक उपक्रमातून या घटकांना मदतीचा हात दिला. सरकारच्या या प्रयत्नांना कॉपोर्रेट क्षेत्र, नागरी समाज आणि नागरिकांचाही मोठा हातभार लागला.

भारताने पुन्हा एकदा सिध्द केले की अशा संकटकाळात, भारत जागतिक समुदायासोबत खंबीरपणे उभा आहे. या आजाराचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर जी धोरणे आखली गेली, त्यातही आपला पुढाकार होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताला विविध देशांकडून मिळालेला अभूतपूर्व पाठींबा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत दर्शवणारा दाखलाच आहे, असे सांगून कोविंद म्हणाले, भारताची ही परंपरा आहे की आपण केवळ स्वत:साठी जगत नाही, तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कष्ट करतो. भारतासाठी आत्मनिर्भर होण्याचा अर्थ म्हणजे, इतर जगापासून विलग न होता किंवा अंतर न राखता, स्वयंपूर्ण होणे. भारत आता आपले वेगळे अस्तित्व कायम राखत, संपूर्ण जगाशी व्यवहार करेल, असे यात अभिप्रेत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*