- १९६२ ची चूक पवारांनी संरक्षणमंत्री असताना का नाही सुधारली…!!
- नितीन राऊतांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर टीका; थोरात, पृथ्वीराज यांच्यानंतर लावला नंबर
- १९७१ चा इंदिराजींचा विजयही पवार विसरले
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांनी चीन – भारत संघर्षावरून खुद्द राहुल गांधींना लक्ष्य केल्यानंतर एका पाठोपाठ एक काँग्रेस नेत्यांनी त्यांचे उट्टे काढायला सुरवात केली आहे. राहुल गांधीच्या निमित्ताने पवारांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला हात घातला, तर काँग्रेसने महाराष्ट्रातील नेत्यांनाच पवारांविरोधात बोलायला “सोडले” आहे.
१९६२ ची चूक तुम्ही संरक्षणमंत्री असताना का नाहीत सुधारलीत?, असा खडा सवाल करून उर्जामंत्री नितीन राऊतांनी पवारांना महाआघाडीतला “घरचा तिसरा आहेर” दिला आहे. आधी बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी “घरचे दोन आहेर” देऊन झाले आहेत.
संरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण करू नये, असे म्हणत शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले होते. त्यावर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राऊत म्हणाले, “पवारासाहेबांनी सुसंवाद ठेवला असता, तर असे वक्तव्य केले नसते. ते स्वतः संरक्षणमंत्री राहिले आहेत, त्या काळात त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या, तर बरं झालं असतं.
यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते, तेव्हा इंदिराजींनी १९७१ चे युद्ध जिंकले होतं. पण, हे पवारांना आठवले असते, तर बरे झाले असते. पवार हे काँग्रेसमध्ये तयार झालेले नेतृत्व आहे. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे. पण, मग राहुल गांधींबद्दल ते तसं कोणत्या संदर्भात बोलले याबाबत माहिती नाही. खरं तर पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रसार माध्यमांना सामोरं जायचा सल्ला द्यायला हवा होता.”
“पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींशी चर्चा करायला हवी होती. ते आमचे नेते आहेत. राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य का केलं हे माहिती नाही. मला वाटतं त्यांच्या तोंडातून ते शब्द निघून गेले असतील. यापुढे निश्चितपणे ते काँग्रेसच्या बाजूने उभे राहतील”, अशी पुस्तीही राऊत यांनी जोडली.
शरद पवार काय म्हणाले होते?
“चीन कुरापत नक्कीच काढत आहे. आपण आपला रस्ता आपल्या हद्दीत करत आहोत. आपण आपल्या भागात जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. सियाचीन भागासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. १९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना चीनला गेलो होतो. त्यावेळी बॉर्डरवरील सैन्य कमी करण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी करार केला”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
“सीमा भागात गस्त घालताना काहीही होऊ शकते. त्यामुळे लगेच संरक्षण मंत्र्यांचे अपयश आहे, असे म्हणू नये”, असंही पवारांनी म्हटले होते. “चीनने यापूर्वीच १९६२ मध्ये भारतीय भूमीचा ताबा घेतला आहे. आज घेतला की नाही, हे माहित नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यात राजकारण आणू नये”, असे आवाहन शरद पवार यांनी केले होते.