वाशीम, नंदूरबार, उस्मानाबाद, गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियान राबवा

  • देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधानांना पत्र

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील चार आकांक्षित जिल्हे, वाशीम, नंदूरबार, उस्मानाबाद आणि गडचिरोलीचा समावेश केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानात करण्यात यावा, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजूर परत आलेल्या सहा राज्यांमधील ११६ जिल्ह्यामध्ये ही योजना पंतप्रधान मोदी यांनी सुरू गेली आहे. स्थलांतरित मजूरांना उपजिविकेचे साधन मिळावे, हा त्याचा हेतू आहे. यात या सहा राज्यांमधील २७ आकांक्षित जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. आगामी १२५ दिवस त्यात स्थलांतरित मजूर, कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा सुद्धा भक्कम होणार आहेत.

या अभियानात महाराष्ट्रातील चार आकांक्षित जिल्हे (अ‍ॅस्पिरेशनल डिस्ट्रीक्ट) वाशीम, नंदूरबार, उस्मानाबाद आणि गडचिरोली यांचा समावेश करण्यात यावा, त्यामुळे याही जिल्ह्यांमध्ये परत आलेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध होईल आणि तेथील पायाभूत सुविधा भक्कम होण्यास मदत मिळेल, असे फडणवीस यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्या कोरोनाच्या टाळेबंदीमुळे या मजुरांना त्यांच्याच जिल्ह्यांत रोजगार यामुळे उपलब्ध होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*