वाढत्या वीज बिलांवरून ठाणेकरांचा संताप

  • महावितरणाच्या विरोधात सोशल मीडियातून एक लाखांहून अधिक ग्राहक एकत्र

विशेष प्रतिनिधी

ठाणे : प्रचंड वाढलेल्या वीज बिलावरून ठाणेकरांचा संताप उसळलाय. महावितरण विरोधात सोशल मीडियातून १ लाखांहून अधिक ठाणेकर ग्राहक एकत्र आले आहेत. महावितरणने गेल्या तीन महिन्यांचं एकत्रित बिल वीज ग्राहकांना पाठवले आहे.

लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे पाचपट विजबिल पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वीजग्राहकांना महावितरणचा झटका बसलेला आहे. अशा परिस्थितीत  ठाण्यातील घोडबंदर परिसरातील 35 अपार्टमेंट्स आणि कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी एकत्रित येऊन महावितरणने पाठवलेल्या या अन्यायी वाढीव वीज बिलांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. सोशल मीडियातून या परिसरातील एक लाखाहून अधिक लोक एकत्र आले असून त्यांनी महावितरणच्या विरोधात आवाज उठवला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत महावितरणने देखील वीजमीटर रिडींग घेतले नव्हते. सर्वच लोक घरांमध्ये असल्यामुळे टीव्ही, फॅन, लाइट्स, एसी , फ्रीज यासह अन्य विद्युत उपकरण घरी सुरूच असतील असे अनुमान काढत महावितरणने तीन महिन्यांचे सरसकट वीज बिल ग्राहकांच्या माथी मारले आहे. हे वीजबिल पाहिल्यानंतर अनेकांना महावितरणचा शॉकच लागलेला आहे.

कारण तीन महिन्यांचं एक पट, नव्हे दोन पट नव्हे, तर तब्बल तीन ते पाच पट बिले नागरिकांना पाठवण्यात आलेली आहेत. ज्यांना १२०० ते २००० रुपयांपर्यंत बिल यायचे त्यांना २५ ते ३५ हजार रुपयांपर्यंत बिले आली आहेत, तर अनेकांना ३५ हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यंतची बिले महावितरण बिनधास्त दडपून पाठवलेली आहेत. या बिलांचा संपूर्ण अभ्यास करून ठाण्यातील घोडबंदर परिसरातील काही जागरूक नागरिकांनी या बिलातील उणीवा महावितरण अधिकाऱ्यांना दाखवल्या. मात्र त्यांनी केवळ आम्ही वरिष्ठांना याची कल्पना देऊ असं म्हणत  वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

महावितरण कडून कोणतही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे नागरिकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रृपच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात केली. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्यांनी आपली बिले एकमेकांना शेअर करायला सुरुवात केली. यातून चर्चा घडवून घोडबंदर परिसरातील ३५ हून अधिक अपार्टमेंट्स आणि अनेक कॉम्प्लेक्समध्ये रहात असलेल्या नागरिकांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केला.

महावितरणने पाठवलेल्या बिलांसंदर्भात जेव्हा नागरिक अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले त्यावेळी त्यांनी हे बिल तीन टप्प्यांमध्ये भरण्याच्या सूचना केल्या. पण एवढ्या विजेचा वापर झालेला नसताना आम्ही ही बिले का भरायची? असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. महावितरण मनमानी पद्धतीने बिल ग्राहकांच्या माथी मारून ती वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र त्यांच्या विरोधात आम्ही लढा उभा करू असा निर्धार इथल्या नागरिकांनी केलेला आहे. नागरिकांनी एक समिती बनवली असून याद्वारे महावितरणच्या विरोधामध्ये एक लाखाहून अधिक ग्राहकांना एकत्रित करण्याची मोहीम सुरू झालेली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकसह इतर सोशल माध्यमांचा वापर करून ठाणे परिसरातील लोकांना एकत्रित करण्यास सुरुवात झालेली आहे.

सरसकट महावितरणने अशा पद्धतीने वीज बिल पाठवल्याचे निदर्शनास आले. या गोष्टी महावितरणच्या निदर्शनास आणून देऊन देखील योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आम्ही सर्वांनी या परिसरातील एक लाखाहून अधिक वीज ग्राहकांना एकत्रित करण्याची मोहीम सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*