- ३० हजार कोटींच्या सुरवातीच्या गुंतवणुकीवर पाणी फिरविण्याचा डाव
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी रेल्वेच्या खासगीकरणाच्या पहिल्याच प्रस्तावाला विरोध केलाय. पण या विरोधाचे नुसते “नाव” आहे, पण त्याआडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेवरच “घाव” घालण्याचा त्यांचा मनसूबा दिसून येतोय. भारतीय खासगी क्षेत्रातून सुरवातीची ३० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. पण या भारतीय गुंतवणूकीवर पाणी फिरविण्याचा त्यांचा डाव दिसतोय.
राहुल गांधी यांनी रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. भारतीय रेल्वे ही गरिबांची जीवनरेषा आहे, ती हिरावून घेऊ नका, असे आवाहन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहे. सरकारने असे केल्यास देशातील जनता सरकारला माफ करणार नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
रेल्वे मंत्रालयाने आज देशातील एकूण १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात असलेले रेल्वेचे जाळे एकूण १२ क्लस्टरमध्ये विभागले गेले आहे. याच क्लस्टरमध्ये या १०९ जोडी मार्गावर खासगी रेल्वे चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
जगातील सर्वात मोठे असलेले भारतातील रेल्वे नेटवर्कद्वारे सुमारे १३ हजार गाड्या धावतात. भारतीय रेल्वे जवळजवळ १२ लाख लोकांना रोजगार देते. प्रवासी सेवेचा एक मोठा भाग सवलतींवर चालतो. यामुळे काही वर्षांपासून रेल्वेला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. हे नुकसान भरून काढणे रेल्वे मंत्रालयाला शक्यही झालेले नाही.
राहुल गांधी ट्विटमध्ये लिहितात, ‘रेल्वे ही गरिबांची एकमेव जीवनरेषा आहे आणि सरकार त्यांच्यापासून ती हिरावून घेत आहे. जे हिरावून घ्यायचे आहे ते घ्या, मात्र हे लक्षात ठेवा- देशाची जनता याचे ठोस उत्तर देईल.’
या प्रस्तावासाठी खासगी क्षेत्राकडून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मेक इन इंडिया योजनेतून भारतीय कंपन्यांना प्राधान्य देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे आणि त्याद्वारे देखभालीचा येणारा मोठा खर्च कमी करणे हा यात उद्देश आहे. रेल्वेचा ट्रान्झिट टाइम कमी करणे, बेरोजगारांसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध करणे, प्रवाशांना योग्य ती सुरक्षा पुरवून जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणेही यातून शक्य होणार आहे. प्रवासी गाड्या चालण्यासाठी खासगी गुंतवणुकीचा रेल्वेचा हा पहिलाच उपक्रम आहे. मात्र राहुल गांधी यांनी या योजनेलाच विरोध केला आहे.