रियानंतर कोण, ठाकरे सरकार आणि परिवाराची चिंता वाढली, किरीट सोमय्या यांचा आरोप

रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर ठाकरे सरकार आणि परिवाराची चिंता वाढली असेल. आता पुढची अटक कोणाला होणार हा प्रश्न त्यांना पडला असेल, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई: रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर ठाकरे सरकार आणि परिवाराची चिंता वाढली असेल. आता पुढची अटक कोणाला होणार हा प्रश्न त्यांना पडला असेल, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत सोमय्या म्हणाले, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच चौकशी व तपासात दिरंगाई केली जात आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दिरंगाईला जबाबदार असलेल्या गृहमंत्री देशमुख यांना तातडीने मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे व पोलीस आयुक्तांना पदावरून दूर करून घरी पाठवलं पाहिजे.

ठाकरे सरकार आणि सरकारमधील काही मंत्री सुशांत प्रकरणी चौकशीला इतके का घाबरत आहेत?, असा सवालही सोमय्या यांनी एका ट्विटमध्ये केला. ठाकरे सरकारने ६० दिवस हे प्रकरण दाबून ठेवलं आणि सीबीआयने फक्त दोन आठवड्यांत ‘करून दाखवलं’ असेही त्यांनी म्हटले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर तपासाची दिशाच बदलली आहे. या प्रकरणी तपासात नार्कोटिक्स विभागाने एंट्री केल्यानंतर अटकसत्र सुरू झालं असून रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर आता अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात यापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आले होते. आदित्य ठाकरे यांचे बॉलीवुडमध्ये अनेकांशी संबंध आहेत. त्यांचे अनेक मित्र आहेत. त्यामुळेच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात करण जोहरसारख्या आदित्यच्या मित्रांची चौकशी झाली नव्हती. आता रियाकडून तपासात अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठाकरे सरकार आणि परिवार चिंतेत असेल असे सोमय्या यांनी म्हटले आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*