गेल्या काही दिवसांपासून सरकारविरुध्द आरोप करताना बेलगाम विधाने करणाऱ्या कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी चांगलेच फटकारले आहे. देशात चीनी व्हायरसचे संकट असताना राहुल गांधी लोकांना निराश करण्याचे काम करत आहेत. हे राष्ट्रच्या हिताचे नाही. राहुल गांधी हे गोबेल्सच्या नीतीवर चालतात, असा आरोप सिंह यांनी केला आहे.
वृत्तसंस्था
बेगुसराय : गेल्या काही दिवसांपासून सरकारविरुध्द आरोप करताना बेलगाम विधाने करणाऱ्या कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी चांगलेच फटकारले आहे.
देशात चीनी व्हायरसचे संकट असताना राहुल गांधी लोकांना निराश करण्याचे काम करत आहेत. हे राष्ट्रच्या हिताचे नाही. राहुल गांधी हे गोबेल्सच्या नीतीवर चालतात, असा आरोप सिंह यांनी केला आहे.
हिटलरच्या प्रचारतंत्रात गोबेल्स याची मोठी भूमिका होती. खोट्या गोष्टी पसरविण्याच्या तंत्राला ‘गोबेल्स निती’ असे म्हणतात. त्याचाच संदर्भ देत गिरीराज सिंह राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले, निराधार आरोप करू नका, सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणात काय म्हटले आहे, याची आठवण ठेवा. राफेल विमाने भारतात आल्यानंतर देशाचे मनोबल तर वाढलेच, पण त्या बरोबरच सैन्यदलाचे मनोबल देखील वाढले. मात्र, राहुल गांधी देशाबरोबरच सैन्यदलाचे मनोबल खच्ची करण्याच्या कामाला लागलेले आहेत.
देशातील चीनी व्हायरसच्या साथीवर केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांवरही राहुल गांधी टीका करत आहेत. यावर गिरिराज सिंह म्हणाले की, जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅनेजमेंट गुरू मानले जात असताना, राहुल गांधी मात्र चीनी व्हायरसवर लस कधी येणार, हे विचारत आहेत. हा काही मुलांचा खेळ नाही. लस तयार करण्यासाठी प्रोटोकॉल आहे. तीन कंपन्या त्यावर काम करत आहेत. संकटाच्या काळात काम केल्यानंतर देखील राहुल गांधी मात्र देशातील लोकांना निराश करण्याचे काम करत आहेत आणि हे राष्ट्रहिताचे नाही.
“जगातील अन्य देशांशी तुलना करता भारतात रुग्ण बरे होण्याच्या दराची आणि मृत्यूदराची स्थिती चांगली आहे,” असे सांगून गिरिराज सिंह म्हणाले. आमचा रुग्ण बरे होण्याचा दर ७५ टक्यांहून अधिक आहे. तसेच मृत्युदर देखील २ टक्क्यांच्या खाली आहे. आता देशात १ हजार टेस्टिंग लॅब आहेत. या लॅबमध्ये दररोज १० लाखांहून अधिक चाचण्या होत आहेत.