राज्यावर आर्थिक संकट आणि मुंबईचे आयुक्त ५० लाख खर्चून सजवताहेत बंगला

चीनी व्हायरसच्या संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे. विकासाच्या योजनांनाही कात्री लावली आहे. मात्र, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चीनी व्हायरसच्या संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे. विकासाच्या योजनांनाही कात्री लावली आहे. मात्र, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळातच मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची बदली होऊन त्यांच्या जागी इक्बालसिंग चहल यांची नियुक्ती झाली होती. काही दिवसांपूर्वीच पावसाने आपल्या बंगल्यात गळती होत असल्याचा व्हिडीओ चहल यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. डागडुजीचे दोन-तीन लाख रुपयांचे काम करण्यापेक्षा चक्क ५० लाख रुपये खर्च करून बंगल्याचे नुतनीकरण करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषेदतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर टीका केली आहे. ते म्हणाले, चीनी व्हायरसमुळे आलेल्या संकटकाळात स्वत:चे बंगले सजविण्यात मश्गुल असणारे मंत्री सरकारी अधिकाऱ्यांना कुठल्या तोंडाने लगाम घालणार? संकटकाळात सरकारी अधिकाऱ्यांनी बंगल्याची डागडुजी करणे योग्य नाही. राज्याचे मंत्री आपापल्या बंगल्यावर करोडोंचा खर्च करत आहेत व गाड्यांवर लाखोंचा खर्च करीत आहेत आणि आता महापालिकेचे आयुक्त आपल्या बंगल्यावर ५० लाखांचा खर्च करीत आहेत हे शोभनीय नाही.

बंगल्यामध्ये किरकोळ गळती वा दुरुस्ती असेल तर २-३ लाख रुपये खर्च करुन ती दुरुस्ती करणे समजण्यासारखे आहे, परंतु कोविडच्या संकटांत अशा प्रकारचा लाखो रुपयांचा खर्च करणे निश्चितच समर्थनीय नाही. सरकारी अधिकारी जनतेच्या पैशाची अशा प्रकारे उधळपट्टी करत असतील तर त्याला लगाम घातला पाहिजे, परंतु स्वत:चे बंगले सजविण्यात मशगुल असणारे मंत्री अधिकाऱ्यांना कुठल्या तोंडाने लगाम घालणार आहे, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे हा प्रकार निंदनीय असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*