राजू शेट्टींनी खुंटा हलवून बळकट केला; गोविंद बागेमार्गे विधान परिषदेचा मोकळा झाला


घरच्या कट्यारीचे घाव दोन दिवसांत बुजले


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : शरद पवारांच्या पाहुणचाराची आमरस पुरी दोन दिवसांच्या “राजकीय व्यायामानंतर” राजू शेट्टींना अखेर पचली. गोविंद बागेमार्गे विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. राजू शेट्टी हे आपले म्हणणे बंडखोर नेते सावकार मादनाईक आणि प्रा. जालंदर पाटील यांच्या गळी उतरविण्यात यशस्वी झाले.

पवार पुरस्कृत आमदारी मिळण्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एेक्य शेतकरी हितासाठी टिकविण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राजू शेट्टी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि सावकार मादनाईक याची नाराजी दूर करण्यात आली.

राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झाला. या भेटीच्या वळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर काही नेतेही होते. त्यावेळी आमरस पुरीचा बेत रंगला. पण सावकार मादनाईक आणि जालंदर पाटील नाराज झाले. अखेर त्यांचा रूसवा काढण्यात राजू शेट्टींना यश आले. काँग्रेस संस्कृतीतले राजकीय बंड जसे शमविण्यात येते तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतले बंड शमविण्यात आले. सर्व नेत्यांचा एकत्रित फोटो काढण्यात आला. पण यावेळी आमरस पुरीचा बेत ठेवण्यात आला नव्हता.

विशेष म्हणजे याआधी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये विधान परिषदेच्या जागेवर चर्चा झाली होती. यावेळी जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शरद पवार आल्यावर घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर राजू शेट्टी यांनी घेतलेल्या पवारांच्या भेटीत राजू शेट्टी यांची विधान परिषदेवरील वर्णी निश्चित झाली.

राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील काही नेते नाराज झाले. यानंतर राजू शेट्टी देखील उद्विग्न झालेले पाहायला मिळाले. “अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच” अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. यानंतर स्वाभिमानी संघटनेत या मुद्द्यावर दोन गट पडले. मात्र, अखेर हा वाद चर्चेतून मिटवण्यात आला. घरच्या कट्यारीचे घाव दोन दिवसांत बुजले

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती