रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांनाही ऑनलाईन विक्रीची व्यवस्था, पंतप्रधानांचे आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावर गाड्या लावून खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मोठी हॉटेल आणि रेस्टॉरंटस ऑनलाइन अन्नपदार्थ विक्री करू शकतात. अशीच व्यवस्था रस्त्यावर गाड्या लावून खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही उपलब्ध करून दिली जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावर गाड्या लावून खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मोठी हॉटेल आणि रेस्टॉरंटस ऑनलाइन अन्नपदार्थ विक्री करू शकतात. अशीच व्यवस्था रस्त्यावर गाड्या लावून खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही उपलब्ध करून दिली जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले.

चीनी व्हायरसमुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची उपजीविका पूर्ववत करण्यासाठी भारत सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यप्रदेश येथील पथ विक्रेत्यांशी संवाद साधत होते.

पंतप्रधान म्हणाले, रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांना त्यांची उत्पादने ऑनलाइन मंचावरून घरोघरी पाठवता यावीत अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे हे लोक मोठ्या हॉटेलप्रमाणेच त्यांचे खाद्यपदार्थ लोकांना घरपोच देऊ शकतील. जर विक्रेत्यांनी पुढाकार घेतला तर सरकार ही योजना पुढे नेईल. या विक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट पद्धतीला उत्तजेन द्यावे. गेल्या तीन चार वर्षांत डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. आता मोबाइलवरून आपण पैसे देऊ शकतो. बँकांच्या प्रतिनिधींनी या विक्रेत्यांपर्यंत पोहोचावे व त्यांना क्यूआर कोडचा उपयोग समजून द्यावा.

मध्यप्रदेशामध्ये राज्यात एक लाख लोकांना स्वनिधी योजनेचा लाभ झाला आहे. याशिवाय दोन महिन्यात साडेचार लाख लोकांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन जे लोक पुढे जात आहेत त्यांचे अभिनंदन करतो. एक लाख लोकांना अशा प्रकारे लाभ देणे हे सोपे काम नव्हते. मध्य प्रदेशपासून इतर राज्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*