मोदी सरकार करणार करदात्यांचा सन्मान, अधिक सवलती मिळणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर टाकणारे करदाते हे राष्ट्र निर्माते आहेत. त्यांना अधिक सवलती मिळायला हव्यात, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

करदात्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने मांडली आहे. या पार्श्वभूमीवर तंजावर येथील प्रसिद्ध विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विधिज्ञ नानी पालखीवाला जन्मशताब्दी समारंभात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन बोलत होत्या.

त्यांनी सांगितले की, करदात्यांच्या हक्कांची सनद सरकार लवकरच जाहीर करणार आहे. प्रामाणिक करदात्यांच्या सोयीसाठी सरकारने याआधी कर व्यवस्थेचे सुलभीकरण, पारदर्शकतेत सुधारणा आणि कर दरांत कपात यासारख्या अनेक उपाययोजना केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी असल्याचा मला आनंद आहे. करदात्यांना योग्य प्रकारे सेवा मिळायला हव्यात, असे पंतप्रधानांचे प्रामाणिक मत आहे. आम्ही करदात्यांना त्यांच्या हक्कांचा जाहीरनामा देणार आहोत. जगात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका यासारख्या फारच थोड्या राष्ट्रांत करदात्यांच्या हक्कांचा जाहीरनामा आहे. करदात्यांना हक्कांचा जाहीरनामा मिळायलाच हवा. आम्ही त्या दिशेने प्रयत्न करीत आहोत. मी आत्मनिर्भर भारत मोहिमेत याची घोषणा केली होती.

आम्ही लवकरच हा जाहीरनामा घेऊन येत आहोत. अर्थसंकल्पात ‘करदात्यांच्या जाहीरनाम्या’ची घोषणा करण्यात आली होती. त्याचे स्वरूप घटनात्मक असेल. प्राप्तिकर विभागाकडून कालबद्ध पद्धतीने सेवा मिळण्यास करदाते त्याद्वारे पात्र ठरतील, असे सीतारामन यांनी सांगितले.

देशातील कर व्यवस्था करदात्यांसाठी अंमलबजाणीच्या दृष्टीने सुलभ आणि सोपी करायला हवी, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलेले आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी सरकारने मूल्यमापनाची ‘चेहराविहिन’ पद्धती स्वीकारली. पडताळणीत कपात केली. इतरही अनेक उपाय सरकारने केले आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये आम्ही कॉर्पोरेट करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि आता भारत हा जगातील सर्वाधिक कमी कर दर असलेला एक देश आहे. कॉर्पोरेट कराची पद्धतीही आम्ही अधिक सुलभ केली आहे. त्यात आता कोणालाही सूट आणि लाभ नाही, असे सीतारामन यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करदात्यांना ‘राष्ट्र निर्माते’ असेच संबोधतात. प्रामाणिक करदाते राष्ट्र उभारणीचेच काम करीत असतात. करदाते येणाऱ्या प्रत्येक सरकारला निधी उपलब्ध करून देत असतात. त्याच निधीद्वारे सरकारे सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम राबवितात. गोरगरिबांच्या उपजीविकेसाठी असे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती