मोदींच्या ‘मन की बात’ व्हिडिओला ९८% डिसलाईक्स परदेशातून, फक्त २% भारतातून

  • हा तर काँग्रेसचा Dislikes strike; भाजपचा आरोप

वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या व्हिडिओला युट्यूबवर मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स दिसल्यानंतर भाजपाचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे.

“गेल्या २४ तासांत युट्यूबवर ‘मन की बात’ व्हिडिओला डिसलाईक करण्याचा संघटीत प्रयत्न झाला. काँग्रेसचा आत्मविश्वास इतका कमी झालाय की, ते हा एक प्रकारचा विजय मिळाल्याप्रमाणे साजरा करतायेत… पण यूट्यूबच्या डेटावरून दिसून येतेय की डिसलाईक्सपैकी केवळ २% भारतातून आहे. उर्वरित ९८% नेहमीप्रमाणे भारताबाहेरून आहे”, असे ट्विट अमित मालवीय यांनी केले आहे. ‘मन की बात’चा व्हिडिओ ‘डिसलाईक’ करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला केला आहे. “परदेशातील बॉट्स आणि ट्विटर अकाउंट्स कॉंग्रेसच्या जेईई-नेटविरोधी मोहिमेचा कायमच भाग राहिले आहेत. राहुल गांधींच्या तुर्कीतील बॉट्सची सक्रियता खूप वाढली आहे. राहुल गांधींना तुर्कीचा एवढा पुळका का आहे?” , असा सवालही मालवीय यांनी केला आहे.

व्हिडिओचा स्क्रीनशॉट व्हायरल :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, ३० ऑगस्ट रोजी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेला संबोधित केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” या कार्यक्रमाचा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने युट्यूबवर पोस्ट केला. पण व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आल्या व मोठ्या प्रमाणात व्हिडिओ ‘डिसलाइक’ केला गेला. त्यामुळे हा विषय बराच चर्चेत आला. सोमवार दुपारपर्यंत हा व्हिडिओ २.२ युजर्सनी बघितला पण त्यातील केवळ ८७ हजार लाइक्स होते. तर, तब्बल ५.८५ लाख जणांनी व्हिडिओ डिसलाइक केला. या व्हिडीओचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डिसलाईक करण्यामागे काय कारण?

देशात सध्या करोनामुळे परीक्षा घेण्यावरून दोन तट पडले आहेत. जेईई व नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. देशातील करोना स्थितीचा विचार करता, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहे. मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी या परीक्षेसंदर्भात कोणतंही भाष्य न केल्यानं नाराजी व्यक्त झाल्याचं दिसत आहे. नागरिकांनी कमेंट करून तशी नाराजी व्यक्त केली आहे.

‘मन की बात’ मोदी कोणत्या विषयावर बोलले?

‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले की, “जगातील खेळण्यांच्या ७ लाख कोटींच्या बाजारपेठेत भारताचा वाटा खूप कमी आहे. तो वाढवण्याची गरज आहे. नवउद्यमींनी एकत्र येऊन खेळणी तयार करावीत. स्थानिक खेळण्यांसाठी आग्रह धरण्याची हीच वेळ आहे. तरुण उद्योजकांनी मुलांसाठी भारतात संगणकाधारित खेळही तयार करावेत. ते खेळ भारतीय संकल्पनांवर आधारित असावेत,” असे मोदींनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*