मोठे मतपरिवर्तन; शाहीनबागेतला आंदोलक नेता आला भाजपात

  • भाजपा आमच्या समाजाचा शत्रू नाही हे सिद्ध करण्यासाठीच पक्षप्रवेश : शहजाद अली
  • सीएए विरोधातील आंदोलन संपल्यानंतर हळूहळू बदलली भूमिका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मोठे मतपरिवर्तन झालेय. दिल्लीतल्या शाहीनबागेतील सामाजिक कार्यकर्ते आणि सीएएविरोधातील (सुधारित नागरिकत्व कायदा) आंदोलनकर्ते शहजाद अली यांनी रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता आणि पक्षाचे नेते श्याम जाजू यांच्या उपस्थितीमध्ये अली यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आमच्या समाजातील काही लोकांना भाजप हा आमचा शत्रू वाटतो. त्याच लोकांचा समज किती चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे असे यावेळी शहजाद अली यांनी स्पष्ट केले.

सीएएसंदर्भातील सर्व समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी आपण एकत्र येऊन चर्चा करुयात असेही अली यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी सीएएवरुन भाजपा सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका करणाऱ्यांमध्ये अली यांचा समावेश होता. मात्र शाहीनबाग येथील आंदोलन संपल्यानंतरच अली यांची भूमिका हळूहळू बदलत गेली. मागील काही आठवड्यांमध्ये त्यांनी सोशल मिडियावर अनेकदा सरकारची बाजू घेणारी भूमिका मांडल्याचे दिसून आले.

अली यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता दिल्ली भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या नवीन टीमची घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. या नवीन पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये अली यांना स्थान मिळणार की नाही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने अनेक नियुक्त्यांसंदर्भात विचार विनिमय अंतिम टप्प्यामध्ये असल्याचे सांगितले. पुढील आठवड्यामध्ये दिल्ली भाजपामधील या महत्वाच्या नियुक्त्यांसंदर्भातील घोषणा केली जणार असल्याची शक्यता या नेत्याने व्यक्त केली. वेगवेगळ्या पदांसाठी काही नेत्यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्ली भाजपाने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने आरएसएसबरोबर एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला असून या आठवड्यामध्ये ही बैठक होणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*