‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’, पंतप्रधान मोदींचा नवा नारा

केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी वस्तूंचे उत्पादन करा. ‘मेक इन इंडिया’चे पुढचे पाऊल ‘मेक फॉर वर्ल्ड’ असल्याचा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भारतीय जनतेला दिला.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी वस्तूंचे उत्पादन करा. ‘मेक इन इंडिया’चे पुढचे पाऊल ‘मेक फॉर वर्ल्ड’ असल्याचा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भारतीय जनतेला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल, मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो.”

“देशात चीनी व्हायरसच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे. आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे,” असे मोदी म्हणाले.

चीनी व्हायरसच्या संकटाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो, असे सांगून “१३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने चीनी व्हायरसवर विजय मिळवू,” असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. ‘व्होकल फॉर लोकल’ जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणार्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणार्या गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चीनी व्हायरसच्या संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. जगाचे उत्पादन केंद्र बनायच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*