मुंबई, एमएमआर क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; चाचण्या, बळीसंख्येचा आढावा घ्या : फडणवीस

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. पनवेलमध्ये संसर्गाचा दर 45 टक्क्यांवर, भिवंडीमध्ये 48 टक्के, मीरा भाईंदरमध्ये 43 टक्के इतके संसर्गाचे प्रमाण आहे. एकिकडे कोरोना चाचण्या नियंत्रित केल्या जात आहेत, तर दुसरीकडे बळीसंख्येत जुने दडविलेले मृत्यू रोज अधिक होत आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा समग्र आढावा घ्यावा आणि त्यावर उपाययोजना कराव्या, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबईत दि. 24 जून 2020 पर्यंत 2,99,369 इतक्या चाचण्या झाल्या होत्या, तर रूग्णसंख्या 69,528 इतकी होती. चाचण्यांच्या संख्येत संसर्गाचे प्रमाण हे 23.22 टक्के इतके होते. यातील 1 ते 23 जून या कालखंडात 97,872 चाचण्या करण्यात आल्या आणि त्यातून 29,017 रूग्ण आढळले, हा दर 29.65 टक्के इतका आहे.

दि. 24 जून रोजीपर्यंत देशात 73,52,911 चाचण्या झाल्या होत्या, त्यापैकी 4,73,105 रूग्ण आढळून आले. संपूर्ण देशात संसर्गाचा दर 6.43 टक्के होता. दि. 24 जून रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक एका दिवशीच्या चाचण्या देशात याचदिवशी करण्यात आल्या. त्या 2,15,195 इतक्या होत्या. त्यातून 16,922 रूग्ण आढळून आले. संसर्गाचे प्रमाण 7.86 टक्के होते.

ठाण्यात आतापर्यंत 37,409चाचण्या झाल्या आणि 11,220 रूग्ण आढळून आले. संसर्गाचे प्रमाण 29.94 टक्के आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 17,604 चाचण्या झाल्या, 6407रूग्ण आढळून आले. संसर्गाचे प्रमाण 36.40 टक्के, पनवेलमध्ये 3500 चाचण्या, 1599 रूग्ण, 45.69 टक्के संसर्ग, कल्याण-डोंबिवलीत 12,186 चाचण्या, 4843 रूग्ण, संसर्ग 39.74 टक्के, मीरा भाईंदरमध्ये 6351 चाचण्या, 2738 रूग्ण, संसर्ग 43.11 टक्के, भिवंडी निजामपूर: 2898 चाचण्या, 1407 रूग्ण, संसर्ग 48.55 टक्के, पालघर, वसई, विरार : 19,692 चाचण्या, 4028 रूग्ण, संसर्ग 20.46 टक्के अशी स्थिती आहे.

कोरोनाविरोधातील लढा हा आकडेवारीकेंद्रीत नको, तर कोरोनाकेंद्रीत हवा, असे आपण सातत्याने सांगतो आहोत. पण, तसे होताना दिसून येत नाही. कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित केल्या जात आहेत, असे सांगताना त्यांनी यासंदर्भातील काही दाखलेही या पत्रात दिले आहेत. बळींची संख्या, संपूर्ण राज्याची फेरपडताळणी पूर्ण केल्यानंतरही दररोज जुने मृत्यू अधिक केले जाणे, यावर सुद्धा सविस्तरपणे त्यांनी पत्रात लिहिले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा मृतदेहांची कोरोना चाचणी बंद करण्याचा आदेश 19 जून रोजी काढण्यात आला. तो रद्द करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

वारंवारच्या आदेशांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. कोरोना पॉझिटिव्ह चाचणीचा अहवाल द्यायचा नाही, हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला, म्हणून बरे झाले. पण, मुंबईत अनेक रूग्ण पळून जातात, ही सुद्धा गंभीर बाब आहे. शासन, प्रशासन म्हणून लोकांनी घाबरून जाऊ नये, म्हणून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची गरजही त्यांनी या सविस्तर पत्रातून नमूद केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*