मुंबईकरांच्या संचाराला बंदीचा तुघलकी निर्णय कोणाचा, अतुल भातखळकर यांचा सवाल

मुंबई शहरामध्ये पोलीसांनी अचानक लोकांना दोन किलोमीटर परीघाच्या क्षेत्राबाहेर जाण्याचा अटकाव केला आहे. या सरकारच्या तुघलकी निर्णयाच्या परंपरेतीलच हा निर्णय आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई शहरामध्ये पोलीसांनी अचानक लोकांना दोन किलोमीटर परीघाच्या क्षेत्राबाहेर जाण्याचा अटकाव केला आहे. या सरकारच्या तुघलकी निर्णयाच्या परंपरेतीलच हा निर्णय आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

एकीकडे लॉकडाऊन संपला आहे, लोकांना संचाराला मुभा आहे असे म्हणत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता लोकांची पोलीसांकडून अडवणूक होत आहे. त्यामुळे रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सामाजिक अंतराचे भान विसरले. त्यामुळे लोकांच्या हालअपेष्टात अधिकच भर पडली. त्यामुळे हा तुघलकी निर्णय घेणारे कोण याची चौकशी करावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवायचा होता. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावामुळे लॉकडाऊन उठवावा लागला. त्यामुळे द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या ठाकरे यांनी मागच्या मार्गाने लॉकडाऊन आणण्याचा प्रयत्न तर केला नाही ना?

चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचीच कबुली एकप्रकारे राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या निर्णयातून देत आहेत, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*