महाराष्ट्रातले पद्म पुरस्कार्थी “आदित्यमर्जी”तून ठरवणार

ठाकरे – पवार सरकारचा “परिपक्व” निर्णय; आदित्य ठाकरे पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी; भाजपचा विरोध


 विशेष प्रतिनिधी

मुंबई : पार्थ पवारांना अपरिपक्व ठरवणाऱ्या ठाकरे – पवार सरकारने आज एक “परिपक्व” निर्णय घेऊन राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी नेमले. त्यामुळे महाराष्ट्रातले पद्म पुरस्कार्थी “आदित्यमर्जी”तून ठरण्याचा मार्ग मोकळा झाला.

पण भाजपने मात्र आदित्य ठाकरेंच्या या नियुक्तीला विरोध केला आहे. आदित्य ठाकरे यांची ही नियुक्ती संयुक्तिक नसल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मांडले आहे.

‘पद्म पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची निवड करणे खूप घाईचे आहे. त्यांच्यासारख्या अननुभवी अशा तरुण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठीची समिती तयार करणे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही. जरी ते राजशिष्टाचार मंत्री असले तरी सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये कोर्टामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. अशावेळी  या सन्मानाच्या पुरस्कारासाठीच्या समितीमध्ये अध्यक्षपदी अनेक जेष्ठ, बुजुर्ग, अनुभवी, मंडळी असताना त्यांची नियुक्ती करणे अयोग्य आहे’, असे प्रविण दरेकर म्हणाले.

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*