माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे मीडिया सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या संजय बारू यांची एका आठवी पास कॅब चालकाने फसवणूक केली आहे. बारू यांची ऑनलाईन दारू खरेदी करताना २४ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे मीडिया सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या संजय बारू यांची एका आठवी पास कॅब चालकाने फसवणूक केली आहे. बारू यांनी ऑनलाईन दारू मागविली असता त्यांची २४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात संजय बारू त्यांचे मीडिया सल्लागार होते. त्यांनी लिहिलेले ‘अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तकही गाजले होते. जावेद अकिब या कॅबचालकाने ऑनलाइन दारू विक्रीसाठी बनावट वेबसाइट तयार केली होती. या वेबसाइटवर स्वत:चा मोबाइल नंबर दिला होता. वेबसाइटवरील नंबरवर फोन करुन बारू यांनी २४ हजार रुपयांच्या दारूची आर्डर दिली. आकिबने आधी ऑनलाइन पेमेंट केले तरच दारूची होम डिलिव्हरी केली जाईल, असे सांगितले.
बारू यांनी फोनवर झालेल्या बोलण्यावर विश्वास ठेवून ऑनलाइन पेमेंट केले. पैसे मिळताच आकिबने वेबसाइटवर दिलेल्या नंबरचे सिम कार्ड मोबाइलमधून काढून टाकले. दारू मिळाली नाही म्हणून बारू यांनी आकिबच्या नंबरवर फोन केला. वारंवार प्रयत्न करुनही संपर्क झाला नाही. अखेर बारू यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
संजय बारू हे फायनान्शियल एक्सप्रेस, बिझनेस स्टँडर्ड अशा वृत्तपत्रांचे चीफ एडिटर होते. त्यांनी इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांसाठी असोसिएट एडिटर म्हणून काम केले होते. त्यांचे वडील बीपीआर विठ्ठल यांनी मनमोहन सिंह यांच्यासोबत काम केले होते.